
टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने 2025 वर्ष खऱ्या अर्थाने गाजवलं. रोहितने या वर्षात फलंदाज म्हणून असंख्य विक्रम केले. तसेच रोहितने कर्णधार म्हणूनही ऐतिहासिक कामगिरी केली. रोहितने एकाच वेळेस नेतृत्वासह फलंदाज ही दुहेरी भूमिका सार्थपणे पार पाडली. रोहितने टी 20i वर्ल्ड कपनंतर इंग्लंड दौऱ्याआधी कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला अर्थात निवृत्ती घेतली. त्यानंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहितकडे असलेलं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून घेण्यात आलं, जे चाहत्यांना पटलं नाही. आता 2025 वर्षातील शेवटचे काही दिवस बाकी आहेत. या निमित्ताने रोहितने सरत्या वर्षात फलंदाज आणि कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊयात.
रोहितने त्याच्या नेतृत्वात भारताला महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध 76 धावांची खेळी केली. रोहितची ही कॅप्टन म्हणून टी 20i वर्ल्ड कपनंतर दुसरी आयसीसी ट्रॉफी ठरली. रोहितच्याच नेतृत्वात भारताने 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकला होता.
रोहितने टी 20i क्रिकेटमधील निवृत्तीनंतर वनडेत धमाका केला. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण केली. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यानंतर एकूण आणि तिसरा भारतीय फलंदाज होण्याचा बहुमान मिळवला.
तसेच रोहित ऑस्ट्रेलियात दौऱ्यात धमाका केला. रोहित सर्वाधिक 6 एकदिवसीय शतकं लगावणारा पहिला फलंदाज ठरला. रोहितने याबाबतीत विराट कोहली आणि श्रीलंकेच्या कुमार संगकारा या दोघांना मागे टाकलं.
रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सिक्सर किंग ठरला. रोहितने पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शाहीद आफ्रिदी याचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकारांचा विक्रम मोडीत काढला आणि वर्ल्ड रेकॉर्ड केला.
तसेच रोहितने आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) कमाल केली. रोहितने आयपीएलमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. रोहित आयपीएलमध्ये विराटनंतर अशी कामगिरी करणारा पहिला तर एकूण दुसरा फलंदाज ठरला. तसेच रोहितने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात षटकारांचं त्रिशतकही पूर्ण केलं.