IND vs NZ : शुबमनकडे नेतृत्व;रोहित-विराटही सज्ज! न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिजसाठी भारताचा संभाव्य संघ
India vs New Zealand Odi Series 2026 : न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक होणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. जाणून घ्या या मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ कसा असणार.

टीम इंडियातील प्रमुख खेळाडू हे सध्या विजय हजारे ट्रॉफी 2025-2026 स्पर्धेत खेळत आहे. टीम इंडिया नववर्षात आपली पहिली मालिका न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यात एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने टी20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. तसेच न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20i मालिकेसाठीही संघ जाहीर केला आहे. तर दुसऱ्या बाजूला एकदिवसीय संघात कुणाला संधी मिळणार? तसेच संभाव्य संघ कसा असणार? याची चाहत्यांना उत्सूकता आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवणात येणार आहे. न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा केव्हा होणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय निवड समिती 3-4 जानेवारीला संघ जाहीर करु शकते. भारताचा एकदिवसीय मालिकेसाठी संभाव्य संघ कसा असू शकतो? हे जाणून घेऊयात.
कॅप्टन शुबमन गिल याचं कमबॅक!
एकदिवसीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याचं संघात पुनरागमन होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच यशस्वी जैस्वाल यालाही संधी मिळाल्यास त्याला शुबमनमुळे प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागू शकतं. शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यानंतर शुबमनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पुन्हा दुखापत झाली. त्यामुळे शुबमनला उर्वरित मालिकेतून बाहेर व्हावं लागलं होतं.
रो-को खेळणार!
टीम इंडियाची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांना दुखापत झाली नाही तर ते खेळणार असल्याचं निश्चित आहे. या दोघांनीही विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आपल्या संघासाठी पहिल्या 2 सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. त्यामुळे या दोघांच्या कमबॅकची चाहत्यांना प्रतिक्षा लागून आहे.
पंतला डच्चू;इशानला संधी?
केएल राहुल हा प्रमुख विकेटकीपर असू शकतो. तसेच निवड समिती ऋषभ पंत याला डच्चू देऊन इशान किशन याचा समावेश करणार असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.
श्रेयसचं काय?
भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कॅच घेताना दुखापत झाली. श्रेयस तेव्हापासून टीम इंडियातून बाहेर आहे. आता श्रेयस वनडे संघाचा भाग असणार की नाही? हे टीम जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
हार्दिक-बुमराहला विश्रांती!
ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या दोघांना आगामी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेनंतर न्यूझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात येऊ शकते.
सिराज-प्रसिधमध्ये चुरस
अर्शदीप सिंह, हर्षित राणा, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हे चौघे एकदिवसीय संघाचा भाग असतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र मोहम्मद सिराद आणि प्रसिध कृष्णा या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंह.
