Team India : टीम इंडियाची पुढील टेस्ट सीरिज केव्हा? जाणून घ्या वेळापत्रक

Indian Cricket Team : टीम इंडियाने पाचवा आणि अंतिम कसोटी सामना जिंकून इंग्लंडला 5 सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवण्यापासून रोखलं. आता टीम इंडिया Wtc 2025-2027 या साखळीतील आपली दुसरी मालिका केव्हा खेळणार? जाणून घ्या.

Team India : टीम इंडियाची पुढील टेस्ट सीरिज केव्हा? जाणून घ्या वेळापत्रक
Team India Celebration at Ovel
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Aug 04, 2025 | 10:19 PM

शुबमन गिल याच्या नेतृत्वातील पहिल्या कसोटी मालिका भारताने बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. टीम इंडिया पाचव्या सामन्याआधी या मालिकेत 1-2ने पिछाडीवर होती. त्यामुळे भारतासाठी पाचवा सामना हा प्रतिष्ठेचा होता. भारतासमोर हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचं आव्हान होतं. भारताने हा सामना जवळपास गमावलाच होता. मात्र भारताने ऐन क्षणी सामन्यात कमबॅक केलं आणि इंग्लंडवर अवघ्या 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. दोन्ही संघाची ही जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-2027 या साखळीतील पहिलीच मालिका होती. दोन्ही संघांनी या आपल्या पहिल्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली.

अशी रंगली मालिका

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्समध्ये झाला. इंग्लंडने विजयी सलामी देत मालिकेत आघाडी घेतली. त्यानंतर भारताने एजबेस्टनमध्ये इंग्लंडचा 336 धावांच्या फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने या विजयासह मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. त्यानंतर तिसरा सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळवण्यात आला. भारताचा या चुरशीच्या सामन्यात अवघ्या 22 धावांनी पराभव झाला. त्यामुले इंग्लंडने यासह मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली.

त्यानंतर भारताने चौथ्या सामन्यात इंग्लंडला विजयापासून रोखलं.  इंग्लंड या सामन्यात भक्कम स्थितीत होती. मात्र रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने नाबाद शतकी खेळी करत सामना बरोबरीत राखला. त्यामुळे भारतासाठी पाचवा आणि अंतिम सामना प्रतिष्ठेचा झाला. भारताने हा सामना जिंकून मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली.

यासह भारताने या दौऱ्याचा शेवट विजयाने केला. भारताचा 2025 मधील हा शेवटचा दौरा ठरला. आता टीम इंडिया या वर्षातील सर्व कसोटी मालिका मायदेशात खेळणार आहे. टीम इंडिया आता ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे.

टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात विंडीज विरुद्ध 2 ते 14 ऑक्टोबरदरम्यान 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर शुबमनसेनेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोव्हेंबरमध्ये 2 मॅचची टेस्ट सीरिज खेळायची आहे.

विंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 2 ते 6 ऑक्टोबर, अहमदाबाद

दुसरा सामना, 10 ते 14 ऑक्टोबर, दिल्ली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 ते 18 नोव्हेंबर, कोलकाता

दुसरा सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, गुवाहाटी