
टीम इंडियाच्या खेळाडूंनी आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी कंबर कसली आहे. यूएईत 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघ या स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरला उड्डाण घेणार असल्याचं म्हटलं जात आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारताचं नेतृत्व करणार आहे. सूर्यकुमार काही आठवडे बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्लीलेंसमध्ये (COE) होता. सूर्याने शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे तिथे घालवले आणि फिटनेस टेस्ट दिली. त्यानंतर सूर्या फिट असल्याचं जाहीर करण्यात आलं.
त्यानंतर आता आशिया कप स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना मोठी अपडेट समोर आली आहे. एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारताचे काही खेळाडू हे सीओएमध्ये एकत्र जमले आहेत. भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आशिया कप स्पर्धेत उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. या स्पर्धेआधी शुबमन सरावासह फिटनेस टेस्टसाठी सीओईला पोहचला. तसेच यावेळेस रोहित आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हे दोघेही तिथे होते. रोहितने कसोटी आणि टी 20I क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर सिराजला आशिया कप स्पर्धेसाठी संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रोहित आणि सिराज प्री सिजन फिटनेस टेस्टसाठी सीओईला पोहचले आहेत.
रोहितची फिटनेस टेस्ट रविवारपर्यंत पूर्ण होईल. रोहित आता फक्त वनडे क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया ऑक्टोबर महिन्यात वनडे आणि टी 20I सीरिजसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसू शकतो. सीओईमध्ये खेळाडूंची ब्रोंको आणि योयो टेस्ट होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, खेळाडूंची पहिल्या दिवशी होणारी टेस्ट झाली आहे. आता उर्वरित टेस्ट रविवारी होणार आहे. त्यानंतर खेळाडूंच्या फिटनेस टेस्टचा निकाल स्पष्ट होईल.
शुबमन इंग्लंड दौऱ्यानंतर आजारी पडला होता. त्यामुळे शुबमनला दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. मात्र शुबमन काही दिवसांपूर्वी पूर्णपणे बरा झाला. शुबमनने सरावालाही सुरुवात केली. त्यामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान आतापर्यंत कोणत्याही दौऱ्यावर जाण्याआधी भारतीय संघातील खेळाडू मुबंईत एकत्र जमायचे. मात्र यंदा आशिया कप 2025 स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना त्यांच्या शहरातून थेट यूएईला पोहचण्याचे आदेश बीसीसीआयने दिल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.