
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सांगता ही टी 20i मालिकेने होणार आहे. उभयसंघात कसोटी आणि एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला. दक्षिण आफ्रिकेने कसोटी तर भारताने एकदिवसीय मालिका जिंकली. त्यामुळे दोन्ही संघांची कामगिरी ही 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांचं लक्ष हे टी 20i मालिका जिंकण्याकडे आहे. या मालिकेत एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. पहिला सामना हा मंगळवारी 9 डिसेंबरला कटकमधील बाराबती स्टेडियममध्ये होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामन्यातील पहिला बॉल टाकला जाणार आहे. या सामन्यानिमित्ताने टीम इंडियाची या मैदानातील आतापर्यंतची कामगिरी कशी राहिली आहे? हे आपण आकड्यांद्वारे जाणून घेऊयात.
टीम इंडियाने आतापर्यंत क्रिकेटच्या इतिहासात या मैदानात एकूण 23 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भारताने या मैदानात 23 पैकी सर्वाधिक 18 कसोटी सामने खेळले आहेत. भारताला 2 एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तर टीम इंडियाने बाराबती स्टेडियममध्ये 3 टी 20i सामने खेळले आहेत.
भारताने या मैदानात 23 पैकी 16 सामने जिंकले आहेत. तर टीम इंडियाला या मैदानात 6 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
टीम इंडियाची ओडीशा क्रिकेट असोसिएशनच्या या स्टेडियममध्ये टी 20 सामन्यांत काही खास कामगिरी राहिलेली नाही. टीम इंडियाचा या मैदानातील 3 पैकी 2 टी 20i सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. तर एकमेव सामनाच जिंकता आला आहे. त्यामुळे टीम इंडिया 9 डिसेंबरला मालिकेत विजयी सलामी देत या मैदानातील दुसरा टी 20i सामना जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान टीम इंडियाचा उपकर्णधार शुबमन गिल आणि अनुभवी ऑलराउंडर हार्दिक पंड्या या जोडीचं या मालिकेतून कमबॅक झालं आहे. हार्दिकला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्याला मुकावं लागलं होतं. तर शुबमनला मानेच्या दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिजमधून बाहेर व्हाव लागलेलं. मात्र हे दोघे आता दुखापतीनंतर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दोघांना पहिल्या टी 20i सामन्यात संधी मिळते की नाही? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.