
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय संघ इंग्लंड विरूद्धच्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4 सामन्यानंतर 1-2 ने पिछाडीवर आहे. तर उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यात टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार होती. या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या निमित्ताने भारताची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं क्रिकेटच्या मैदानात कमबॅक होणार, हे निश्चित होतं. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र हा दौरा स्थगित करण्यात आला. त्यामुळे भारतीच चाहत्यांना या जोडीला पाहण्यासाठी आणखी काही महिने प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता रोहित-विराट चाहत्यांना आणखी एक मोठा झटका लागला आहे. विराट आणि रोहितला आगामी आशिया कप 2025 स्पर्धेतही खेळता येणार नाहीय. रोहित-विराटला या स्पर्धेत खेळता न येण्यामागचं कारण जाणून घेऊयात.
अनेक बैठका आणि चर्चांनंतर एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट परिषदेने शनिवारी 26 जुलैला आशिया बहुप्रतिक्षित कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एसीसीने दिलेल्या माहितीनुसार 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान एकूण 8 संघात स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटांमध्ये विभागण्यात आलं आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध सामने खेळणार नसल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवलं आहे. त्यामुळे या कट्ट्रर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार असल्याचं निश्चित झालं आहे. ए ग्रुपमध्ये भारतासह पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश आहे. तर हाँगकाँग, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे 4 संघ बी ग्रुपमध्ये आहेत.
आशिया कप 2023 स्पर्धा वनडे फॉर्मेटनुसार खेळवण्यात आली होती. त्या स्पर्धेत भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आशिया कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. तर यंदा आगामी 2026 टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धा टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. विराट आणि रोहित या दोघांनीही 2024 च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयानंतर टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तसेच टी 20 फॉर्मेटने या स्पर्धेत सामने होणार असल्याने विराट-रोहितला या स्पर्धेत खेळता येणार नाही.