
इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. तिसर्या दिवसाचा खेळ बरोबरीत राहिला. इंग्लंडने पहिल्या डावात जो रुट याच्या शतकी खेळीच्या जोरावर 387 रन्स केल्या. भारतानेही प्रत्युत्तरात 387 धावा केल्या. टीम इंडियासाठी केएल राहुल याने शतक ठोकलं. त्यानंतर इंग्लंडने दुसऱ्या डावात 1 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 2 धावा केल्या. मात्र इंग्लंडच्या झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने वेळकाढूपणा केल्याने तिसर्या दिवशी अखेरीस 2 ऐवजी फक्त 1 ओव्हरचा खेळ होऊ शकला. त्यामुळे मैदानात राडा पाहायला मिळाला. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडच्या सलामी जोडीला वेळकाढूपणा केल्याने आक्रमक होत जाब विचारला. त्यामुळे तिसरा दिवस गाजला.
ऋषभ पंत आणि केएल राहुल या जोडीने 3 आऊट 145 रन्सपासून तिसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. दोघांनी संयमी बॅटिंग करत पहिल्या सत्रावर घट्ट पकड मिळवली. पंतने या दरम्यान अर्धशतक झळकावलं. तर दुसऱ्या बाजूला केएल शतकाच्या दिशेने पुढे जात होता. सर्वकाही मस्त सुरु होतं. मात्र लंचच्या आधी नको तेच घडलं. लंचआधीच शतक व्हावं यासाठी पंतचा 1 धाव घेत केएलला स्ट्राईक देण्याचा प्रयोग फसला. बेन स्टोक्स याने अचूक थ्रो करत पंतला नॉन स्ट्राईक एंडवर रन आऊट केलं. पंत अशाप्रकारे 74 धावांवर बाद झाला.
केएलने लंचनंतर लॉर्ड्समध्ये सलग दुसरं तर एकूण दहावं शतक ठोकलं. मात्र केएल शतकानंतर आऊट झाला. शोएब बशीर याने केएलला स्लीपमध्ये हॅरी ब्रूकच्या हाती कॅच आऊट केलं.
केएल आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर 5 आऊट 254 असा झाला. रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी या जोडीने सहाव्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी केली. त्यानंतर बेन स्टोक्स याने नितीशला 30 रन्सवर आऊट केलं. जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी 50 धावा जोडल्या. जडेजाने या दरम्यान सलग तिसरं अर्धशतक ठोकलं. जडेजाच्या या संयमी आणि चिवट खेळीला ख्रिस वोक्स याने ब्रेक लावला. जडेजा 72 धावा करुन आऊट झाला.
त्यानंतर आकाश दीप याने 1 सिक्ससह 7 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर 23 धावांवर बाद झाला. यासह टीम इंडियाचा डाव 119.2 षटकांत 387 धावांवर आटोपला. टीम इंडियाला आघाडी घेण्याची संधी होती. मात्र शेवटच्या टप्प्यात इंग्लंडने टीम इंडियाला झटपट झटके देत गुंडाळलं आणि आघाडी घेण्यापासून रोखलं.
शेवटच्या ओव्हरमध्ये राडा, पाहा व्हीडिओ
Always annoying when you can’t get another over in before close 🙄 pic.twitter.com/3Goknoe2n5
— England Cricket (@englandcricket) July 12, 2025
टीम इंडिया ऑलआऊट झाल्यानंतर तिसऱ्या दिवसातील फक्त 16 मिनिटं शेष होती. त्यात 10 मिनिटांचा इनिंग ब्रेक होता. त्यामुळे उर्वरित वेळेत फार फार 2 षटकांचा खेळ झाला असता. इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि बेन डकेट ही सलामी जोडी मैदानात आली. तर टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह पहिली ओव्हर टाकायला तयार झाला. मात्र इंग्लंडच्या सलामी जोडीने कमीत कमी षटकांचा खेळ व्हावा या प्रयत्नाने वेळकाढूपणा केला.
स्ट्राईकवर असणाऱ्या क्रॉलीने विनाकारण वेळ वाया घालवला. त्यामुळे पहिलाच बॉल टाकण्यात विलंब झाला. फक्त 1 ओव्हरचाच खेळ व्हावा यासाठी इंग्लंडच्या जोडीकडून हे प्रयत्न सुरु होते. त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे बुमराहने हात उंचावून हे काय चाललंय? असं इशाऱ्याने म्हटलं.
क्रॉलीची ही मस्ती पहिल्या षटकादरम्यान अशीच सुरु राहिली. या दरम्यान बुमराहने ओव्हरमधील टाकलेला पाचवा बॉल इंग्लंडच्या ओपनरच्या हातावर लागला. त्यामुळे फलंदाजाने ड्रेसिंग रुमच्या दिशेने हात दाखवला. मात्र ही जोडी वेळकाढूपणा करतेय, असंच वाटत होतं. त्यामुळे भारताच्या खेळाडूंनी इंग्लंडच्या सलामी जोडीवर संताप व्यक्त केला.
शुबमन या सर्व प्रकारावरुन इंग्लंडच्या जोडीवर संतापला. शुबमन आधी खूप काही बोलला. त्यानंतर शुबमन झॅकच्या जवळ गेला. शुबमनने क्रॉलीला चांगलंच ऐकवलं. तसेच शुबमनने ड्रेसिंग रुमच्या दिशेने हाताने क्रॉसची खूण करुन दाखवली. त्यानंतर या वादात बेन डकेट यानेही उडी घेतली. शुबमनने त्यालाही टप्प्यात घेतला. अशाप्रकारे तिसऱ्या दिवसाचा शेवट वादाने झाला. आता चौथा दिवस सामन्याच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.