वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा फटका, दुसऱ्या कसोटीचं गणित समजून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर उलथापालथ होताना दिसत आहे. भारताने दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना गमवल्याने उलथापालथ झाली आहे. इतकंच काय भारताच्या गुणतालिकेत घसरण झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा फटका, दुसऱ्या कसोटीचं गणित समजून घ्या
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 गुणतालिकेत टीम इंडियाला मोठा फटका, दुसऱ्या कसोटीचं गणित समजून घ्या
Image Credit source: South Africa Cricket Twitter
| Updated on: Nov 16, 2025 | 7:44 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत भारतीय तिसरी कसोटी मालिका खेळत आहे. तिसऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेने 123 धावा केल्या आणि विजयासाठी 124 धावांचं आव्हान दिलं. पण हे आव्हान गाठताना दक्षिण अफ्रिकेचा संघ 93 धावांवर बाद झाला. दक्षिण अफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता भारतासमोर कसोटी मालिका वाचवण्याचं आव्हान आहे. दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला तर भारताला मालिका गमवावी लागेल. दुसरीकडे पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. भारताची तिसऱ्या स्थानावरून थेट चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.

भारत दक्षिण अफ्रिका कसोटी सामना होण्यापूर्वी भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर होता. मात्र आता पराभवामुळे चौथ्या स्थानावर गेला आहे. भारताची विजयी टक्केवीरा आता 54.17 टक्के आहे. भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेला पहिल्याच कसोटी सामन्यातील विजयामुळे जबरदस्त फायदा झाला आहे. दक्षिण अफ्रिकेचा संघ थेट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. दक्षिण अफ्रिकेने आतापर्यंत एकूण कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ही 66.67 टक्के असून दुसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियाने 100 टक्के विजयी टक्केवारीसह पहिल्या, श्रीलंका 66.67 टक्के विजयी टक्केवारीसह तिसऱ्या, पाकिस्तान 50 टक्के विजयी टक्केवारीसह पाचव्या, इंग्लंड 43.33 टक्क्यांसह सहाव्या स्थानावर आहे. तर बांग्लादेश सातव्या, वेस्ट इंडिज आठव्या आणि न्यूझीलंड नवव्या स्थानावर आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालानंतर कसं असेल गणित?

भारत आणि दक्षिण अफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर गुणतालिकेत पुन्हा उलथापालथ होताना दिसणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर तिसऱ्या स्थानी पोहोचेल. तेव्हा भारताची विजयी टक्केवारी 59.26 होईल. तर दक्षिण अफ्रिका चौथ्या स्थानावर घसरेल. सामना ड्रा तर दक्षिण अफ्रिका 58.33 टक्केवारीसह तिसऱ्या, तर भारत 51.85 टक्केवारीसह चौथ्या स्थानावर राहील. दक्षिण अफ्रिकेने हा सामना जिंकला तर 75 टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर, तर भारत 48.15 टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरेल.