WTC Points Table: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावताच टीम इंडियाची दैना, पाकिस्तान गेला पुढे

दक्षिण अफ्रिकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाला क्लिन स्विप दिला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत नाचक्की झाली आहे. पाकिस्तानचा संघही भारताच्या पुढे निघून गेला आहे.

WTC Points Table: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावताच टीम इंडियाची दैना, पाकिस्तान गेला पुढे
WTC Points Table: दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका गमावताच टीम इंडियाची दैना, पाकिस्तान गेला पुढे
Image Credit source: Proteas Men Twitter
Updated on: Nov 26, 2025 | 4:16 PM

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडिया गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर होती. पहिल्या सामना गमावल्यानंतर टीम इंडियाच्या विजयी टक्केवारीत घट झाली होती. त्यामुळे चौथ्या स्थानी घसरण झाली. न्यूझीलंडनंतर दक्षिण अफ्रिकेने टीम इंडियाला घरच्या मैदानावर क्लिन स्विप दिला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला 408 धावांनी पराभवाची धूळ चारली आणि मालिका 2-0 ने जिंकली. दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव होताच टीम इंडियाची तिसऱ्या स्थानावरून घसरण झाली आहे. टीम इंडियाला तिसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरली आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सुरु असलेल्या प्रवासाला ब्रेक लागला आहे. खरं तर आता टीम इंडियाचं अंतिम फेरी गाठणं खूपच कठीण आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-2027 स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात इंग्लंड दौऱ्यापासून झाली होती. खरं तर पहिलाच दौरा खूपच कठीण होता. मात्र भारताने ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरी कसोटी मालिका भारताने 2-0 ने जिंकली. पण दक्षिण अफ्रिकेविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 ने गमावली. भारताने एकूण 9 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 4 सामन्यात विजय आणि 4 सामन्यात पराभव झाला आहे. तर एक सामना ड्रॉ झाला. त्यामुळे भारताच्या पारड्यात 52 गुण आहेत. पण विजयी टक्केवारी 48.12 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. त्यामुळे भारताला पाचव्या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे.

भारताला क्लिन स्विप दिल्यानंतर दक्षिण अफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. दक्षिण अफ्रिकेने 75 टक्के विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 100 टक्क्यांसह पहिल्या स्थानी आहे. तर श्रीलंकेचा संघ 66.67 विजयी टक्केवारी तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा संघ चौथ्या स्थानावर असून विजयी टक्केवारी 50 आहे. पाकिस्तानने 2 कसोटी सामने खेळले आहेत. एक सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे.

भारतीय संघ आता थेट पुढच्या वर्षी ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात दोन सामने खेळणार आहे. दोन्ही सामने भारताने जिंकले तर विजयी टक्केवारी 57.58 टक्के होईल. दोन्ही सामने गमावले तर विजयी टक्केवारी 39.39 टक्के होईल. एक सामना जिंकला आणि एक गमावला तर विजयी टक्केवारी 48.48 टक्के राहील. दोन्ही सामने ड्रॉ झाले तर विजयी टक्केवारी 45.45 राहील. तुर्तास पुढच्या वर्षीपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये भारताची विजयी टक्केवारी आहे तशीच राहील.