
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी सर्व तयारी झाली आहे.स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघात एका ट्रॉफीसाठी लढत पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा यूएईकडे आहे. दुबई आणि अबुधाबीतील 2 स्टेडियममध्ये या स्पर्धेतील सामने होणार आहेत. यंदा 2022 नंतर पहिल्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी 20i फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे. आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात भारत सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने वनडे आणि टी 20 या दोन्ही फॉर्मेटने झालेल्या स्पर्धेत आपला ठसा उमटवला आहे. तसेच भारतीय संघ गतविजेता आहे. भारताने 2023 साली झालेल्या वनडे आशिया कप स्पर्धेत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात श्रीलंकेचा पराभव केला होता. त्यामुळे आता कॅप्टन सूर्यासमोर ही ट्रॉफी कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. तसेच सूर्यासमोर या स्पर्धेत खास कामगिरी करण्याची संधी आहे.
सूर्याकडे आशिया कप स्पर्धेत भारताकडून शतक करणारा एकूण पाचवा कर्णधार होण्याची संधी आहे. आतापर्यंत भारतासाठी 4 कर्णधारांनी वनडे आशिया कप स्पर्धत शतकं केली आहेत. तर वनडे आणि टी 20 या दोन्ही फॉर्मेटमध्ये शतक करणारा विराट कोहली हा भारताचा एकमेव फलंदाज आहे. त्यामुळे यंदा सूर्या टी 20i आशिया कप स्पर्धेत शतक लगावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
पहिल्यांदा टी 20 फॉर्मेटने 2016 साली आशिया कप स्पर्धा खेळवण्यात आली. त्याआधी आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटने व्हायची. या स्पर्धेच्या इतिहासात सौरव गांगुली शतक करणारा भारताचा कर्णधार होता. गांगुलीने 2000 साली बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी केली होती.
महेंद्रसिंह धोनी याने गांगुलीनंतर 8 वर्षांनी कॅप्टन म्हणून शतक ठोकलं होतं. धोनीने 2008 साली हाँगकाँग विरुद्ध 100 धावा केल्या होत्या.
विराट कोहली भारतासाठी वनडे आशिया कप स्पर्धेत शतक करणारा तिसरा कर्णधार ठरला. विराटने 2014 साली बांगलादेश विरुद्ध शतक झळकावलं होतं.
विराटनंतर भारताला आशिया कप स्पर्धेत कर्णधाराच्या बॅटने शतक येण्यासाठी 4 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. रोहित शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध 2018 मध्ये शतक केलं होतं. या चौघांव्यतिरिक्त भारतासाठी या स्पर्धेत अनेकांनी फलंदाज म्हणून शतक केलं आहे. मात्र कर्णधार म्हणून या चौघांनाच वनडे आशिया कप स्पर्धेत शतक करता आलं आहे.
दरम्यान विराट वनडे आणि टी 20 या दोन्ही आशिया कप स्पर्धेत शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज आहे. विराटने 2022 साली शतक केलं होतं. विराटने अफगाणिस्तान विरुद्ध केएल राहुल याच्यासह शतकी भागीदारी केली होती. विराटने या दरम्यान शतक ठोकलं होतं. तेव्हा केएल राहुल भारताचा कर्णधार होता.
तसेच हाँगकाँगच्या बाबर हयात याने 2016 साली पहिल्याच टी 20 आशिया कप स्पर्धेत शतक केलं होतं. अशाप्रकारे टी 20 आशिया कप स्पर्धेत फक्त दोघांनाच फलंदाज म्हणून शतक करता आलं आहे. त्यामुळे सूर्यकुमार टी 20 आशिया कप स्पर्धेत शतक करणारा पहिलावहिला कर्णधार ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे