PAK vs IND : पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याआधी चाहत्यांना सूर्यामुळे टेन्शन, कारण काय?
Suryakumar Yadav vs Pakistan In T20i आशिया कप 2025 स्पर्धेला 2 आठवडे बाकी आहेत. स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी सूर्यकुमार यादव याच्या पाकिस्तान विरूद्धच्या आकडेवारीमुळे भारतीय चाहत्यांना टेन्शन आलं आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरही आशिया कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना होणार असल्याचं स्पष्ट आहे. भारताच्या क्रीडा मंत्रालयाने या सामन्याला तीव्र विरोधानंतरही हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे हा सामना होणार म्हणजे होणार हे निश्चित आहे. आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 14 सप्टेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तानने या स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. त्यानुसार सलमान अली आगा पाकिस्तानचं नेतृत्व करणार आहे. तर सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव 2024 पासून टी 20I संघांच नेतृत्व करत आहे. मात्र सूर्याच्या आकड्यामुळे महामुकाबल्याआधी चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
आशिया कप स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएईचा समावेश आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. तसेच दोन्ही संघ सुपर 2 मध्येही आमनेसामने येऊ शकतात. मात्र 14 सप्टेंबरच्या सामन्याआधीच भारतीय चाहत्यांची डोकेदुखी वाढली आहे. सूर्याची पाकिस्तान विरुद्धची आकडेवारी हे चाहत्यांच्या डोकेदुखीचं प्रमुख कारण आहे.
सूर्या पाकिस्तान विरुद्ध ढेर
सूर्याने टी 20I क्रिकेटमध्ये अनेक धावांसंह विक्रमही केले आहेत. मात्र सूर्याला पाकिस्तान विरुद्ध काही खास करता आलं नाहीय. सूर्याला पाकिस्तान विरूद्धच्या 5 टी 20i सामन्यांमध्ये फक्त 64 धावाच करता आल्यात. सूर्याला या पाचही सामन्यात पाकिस्तानच्या आघाडीच्या गोलंदाजांचा सामना करावा लागला आहे. सूर्याला या 5 सामन्यांमध्ये शाहीन अफ्रीदी, नसीम शाह आणि हारीस रऊफ या त्रिकुटाने बॉलिंगने हैराण केलं आहे.
सूर्यासाठी हारीस रऊफ डोकेदुखी
हारीस रऊफ सूर्यासाठी कायमच डोकेदुखी ठरला आहे. हारीसनेच सूर्याला गेल्या 2 टी 20I सामन्यांमध्ये बाद केलं आहे. भेदक आणि अचूक माऱ्यासमोर सूर्या आऊट झाला. मात्र हा भूतकाळ आहे. सूर्याने गेल्या काही काळात सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे सूर्या पाकिस्तान विरुद्ध जोरदार कमबॅक करेल, अशी आशा आणि विश्वास चाहत्यांना आहे.
दरम्यान टीम इंडिया पाकिस्तान व्यतिरिक्त साखळी फेरीत आणखी 2 सामने खेळणार आहे. भारतीय संघ आशिया कप मोहिमेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएई विरुद्ध खेळणार आहे. तर भारताचा ओमान विरुद्धचा सामना हा 19 सप्टेंबरला होणार आहे.
