Suryakumar Yadav : ‘या’ कारणासाठी सूर्यकुमार यादवने म्हटलं सॉरी
Suryakumar Yadav : भारताच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने सॉरी म्हटलं आहे. सध्या सूर्यकुमार पत्नीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतोय. टीम इंडियाच्या T20 वर्ल्ड कप विजयात सूर्यकुमार यादवच महत्त्वाच योगदान आहे. त्याने बाऊंड्री लाईनवर डेविड मिलरचा पकडलेला ऐतिहासिक झेल आजही सर्वांच्या स्मरणात आहे.

भारताच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव मुंबईकडून बुची बाबू टुर्नामेंटमध्ये खेळणार आहे. 27 ऑगस्टला कोईम्बतोरमध्ये जम्मू-काश्मीर विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव खेळणार आहे. मागच्या आठवड्यात सूर्यकुमार यादवने बुची बाबू टुर्नामेंटमध्ये खेळणार असल्याच स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीर विरुद्धच्या सामन्यासाठी श्रेयस अय्यर सुद्धा उपलब्ध असेल, असं मुंबई क्रिकेट असोशिएशनचे संयुक्त सचिव दीपक पाटील यांनी सांगितलं.
नुकतच T20 मालिकेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने श्रीलंकेवर 3-0 ने विजय मिळवला. सूर्यकुमार सध्या पत्नी देविशा शेट्टी सोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. बुधवारी त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेयर केला आणि कॅप्शन दिलं. ‘कपडो के लिये माफी, इस काम के लिये टाइम ही टाइम हैं’
सूर्यकुमारसाठी ही टुर्नामेंट का महत्त्वाची ?
बुची बाबू करंडक ही भारतातील प्रतिष्ठीत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आहे. सूर्यकुमार आणि अय्यर दोघांच्या क्रिकेटींग कौशल्यात यामुळे अधिक सुधारणा होईल. टीम इंडियातील अनेक सिनियर खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळताना दिसू शकतात. बीसीसीआयकडून यासाठी जोर लावला जात आहे. T20 मध्ये सूर्यकुमार यादव यशस्वी आहे. पण वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सूर्यकुमारला तसच यश मिळवता आलेलं नाही. त्या दृष्टीने सूर्यकुमार यादवसाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा महत्त्वाच्या आहेत.

मुंबईची फलंदाजी मजबूत
सर्फराज खानकडे मुंबईच नेतृत्व असेल. रणजीमध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या सर्फराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाल्यानंतर आपली छाप उमटवली आहे. सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यरमुळे मुंबईची फलंदाजीची फळी अजून मजबूत होईल. टुर्नामेंटध्ये मुंबईकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
