
मेन्स टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका 3-1 ने जिंकली. भारताने या विजयासह 2025 चा शेवट गोड केला. भारताने या वर्षात अपवाद वगळता सर्वच प्रकारात चांगली कामगिरी केली. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तसेच आशिया कप ट्रॉफी आपल्या नावावर केली. आता टीम इंडिया 2026 जानेवारीत मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि टी 20i सीरिज खेळणार आहे. त्याआधी आयसीसीने रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये टीम इंडियाचा दबदबा कायम आहे. भारताचे खेळाडू या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी कायम आहेत. मात्र कर्णधार सूर्यकुामर यादव याला मोठा झटका लागला आहे.
ताज्या आकडेवारीनुसार, टीम इंडियाचे तब्बल 5 खेळाडू वेगवेगळ्या फॉर्मेटमधील रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहेत. भारताचा कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये धमाका पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा वनडे रँकिंगमध्ये टॉपला आहे. यॉर्करकिंग जसप्रीत बुमराह कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. रवींद्र जडेजा नंबर 1 ऑलराउंडर आहे. तर अभिषेक शर्मा टी 20i रँकिंगमधील नंबर 1 बॅट्समन आहे. मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने त्याचं सिंहासन कायम राखलं आहे.
एका बाजूला भारताच्या या 5 खेळाडूंनी आयसीसी रँकिंगमधील आपला दबदबा कायम राखला आहे. तर दुसऱ्या बाजूला सूर्याला त्याच्या सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरीचा फटका बसला आहे. सूर्या गेल्या अनेक महिन्यांपासून फलंदाज म्हणून अपयशी ठरला आहे. त्याचाच फटका सूर्याला टी 20i रँकिंगमध्ये बसला आहे.
सूर्या टॉप 10 मधून बाहेर फेकला गेला आहे. सूर्यावर अनेक महिन्यांनंतर टी 20i रँकिगमधील पहिल्या 10 मधून बाहेर पडण्याची वेळ ओढावलीय. सूर्याला 2025 वर्षात 220 धावाही करता आलेल्या नाहीत. सूर्याने भारताला बॅटिंगच्या जोरावर अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र सूर्याला आता धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. सूर्यकुमार यादव याने या वर्षात 21 टी 20i सामन्यांमध्ये अवघ्या 218 धावा केल्या आहेत.
बुमराहच्या खात्यात 879 रेटिंग पॉइंट्स आहेत. पॅट कमिन्स याने इंग्लंड विरुद्ध एशेस सीरिजमधील तिसऱ्या सामन्यात चमकदार कामगिरी केली. पॅटला त्याचाच फायदा झाला. ताज्या आकडेवारीनुसार, पॅट 4 स्थानांची झेप घेत गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. पॅटच्या खात्यात 849 रेटिंग पॉइंट्स आहेत. अशाप्रकारे बुमराह आणि पॅटच्या रेटिंगमध्ये फक्त 30 पॉइंट्सचा फरक आहे.