
टीम इंडियाच्या 5 कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्याची सांगता झाली. भारतीय संघाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात सनसनाटी विजय मिळवत इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून पद्धतशीर रोखलं. भारतीय संघ चौथ्या सामन्यानंतर या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर होती. त्यामुळे भारतासाठी पाचवा सामना फार महत्त्वाचा होता. मात्र भारताने या सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-2 ने बरोबरी राखण्यात यश मिळवलं. भारताची ही आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील पहिलीच मालिका होती. त्यानंतर आता भारतीय संघाला या मालिकेत आणखी 5 संघांविरुद्ध कसोटी मालिकेत दोन हात करायचे आहेत. भारतासाठी अंतिम फेरीच्या दृष्टीने या सर्व मालिका निर्णायक आणि महत्त्वाच्या आहेत.
टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यानंतर आता आशिया कप 2025 स्पर्धेत सहभागी होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये करण्यात आलं आहे. त्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट टीम ऑक्टोबर महिन्यात कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभयसंघातील पहिला सामना 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये होणार आहे. तर 10 ऑक्टोबरपासून दुसरा आणि अंतिम सामना नवी दिल्लीत होणार आहे. भारताची आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेच्या चौथ्या साखळीतील (WTC 2025-2027) ही मायदेशातील पहिलीच मालिका असणार आहे.
टीम इंडिया मायदेशात विंडीजनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भिडणार आहे. उभयसंघातील ही मालिका नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. या मालिकेत एकूण 2 सामने होणार आहेत. पहिला सामन्याला 14 तर दुसऱ्या सामन्याला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया त्यानंतर नववर्षातील पहिली कसोटी मालिका विदेशात खेळणार आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामने होतील.
दरम्यान टीम इंडिया 2026 मध्ये न्यूझीलंड दौरा करणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध कसोटी (2 सामने), एकदिवसीय (3 सामने) आणि टी 20i (5 सामने) मालिका खेळणार आहे. तर टीम इंडिया डब्ल्यूटीसीच्या चौथ्या साखळीतील शेवटच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर (Australia Tour Of India 2027) येणार आहे.