
आशिया कप 2025 स्पर्धेला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 8 पैकी 6 संघांची घोषणा करण्यात आली आहे. तर ए आणि बी ग्रुपमधील प्रत्येकी 1-1 संघाने अजूनही खेळाडूंची नावं जाहीर केली नाहीत. या स्पर्धेत 14 सप्टेंबरला होणाऱ्या महामुकाबल्याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान पहिल्यांदाच आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांचे 2 अनुभवी खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.
यंदा टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेतील सामने होणार आहेत. पीसीबीने या स्पर्धेसाठी सर्वात आधी संघ जाहीर केला. पीसीबीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांना डच्चू दिला. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने टी 20i फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे हे दोघेही या स्पर्धेत दिसणार नाहीत. या निमित्ताने आपण या स्पर्धेत विराट कोहली आणि बाबर आझम या दोघांपैकी सर्वाधिक धावा कुणी केल्यात? हे जाणून घेऊयात.
विराट आणि बाबर या दोघांच्या आकड्यांमध्ये खूप अंतर आहे. विराटने 26 तर बाबरने 16 सामने खेळले आहेत. विराटने या स्पर्धेतील दोन्ही फॉर्मेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. विराटने आशिया कप स्पर्धेतील 16 सामन्यांमध्ये (एकदिवसीय) 61.83 च्या सरासरीने 742 धावा केल्या. विराटने यात 4 शतकं आणि 1 अर्धशतक झळकावलं. तसेच विराटचा वनडे आशिया कप स्पर्धेतील 183 हायस्कोर आहे.
आशिया कप टी 20 फॉर्मेटने होण्याची यंदाची तिसरी वेळ असणार आहे. याआधी 2016 आणि त्यानंतर 2022 साली टी 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विराटने या दोन्ही वेळेस एकूण 10 सामन्यांमध्ये 85.80 च्या सरासरीने 429 धावा केल्या आहेत. विराटचा टी 20 मधील नॉट आऊट 122 हा हायस्कोअर आहे.
बाबर वनडे आशिया कप स्पर्धेत 10 सामने खेळला आहे. बाबरने या 10 सामन्यांमध्ये 40.33 च्या सरासरीने 363 धावा केल्या आहेत. बाबरची एकदिवसीय आशिया कपमधील 151 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यामुळे सर्वोच्च धावसंख्येबाबतही विराट बाबरपेक्षा सरस आहे.
विराट सरासरीबाबतही बाबरला वरचढ आहे. दोघांच्या सरासरीत 22 चा फरक आहे. विराटने 62 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर बाबरचा एव्हरेज 40 आहे.