
टीम इंडियाने 2026 वर्षातील सुरुवात विजयाने केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात न्यूझीलंडवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने मात केली आहे. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 301 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 6 बॉलआधी पूर्ण केलं. टीम इंडियाने 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 306 धावा केल्या. टीम इंडियाचा न्यूझीलंड विरुद्धचा 2025 पासूनचा हा सलग आठवा एकदिवसीय विजय ठरला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धचे हे आठही सामने विजयी धावांचा पाठलाग करताना जिंकले आहेत. टीम इंडियाच्या विजयात विराट कोहली याने बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. तसेच रोहित शर्मा, कर्णधार शुबमन गिल, उपकर्णधार श्रेयस अय्यर यांनी योगदान दिलं. तर निर्णायक क्षणी हर्षित राणा आणि केएल राहुल या जोडीने प्रत्येकी 29 धावा करत भारताचा विजय निश्चित केला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
कर्णधार शुबमन गिल याने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी बोलावलं. न्यूझीलंडसाठी डॅरेल मिचेल याने सर्वाधिक 84 धावा जोडल्या. ओपनर हेन्री हेन्री निकोल्स याने 62 तर डेव्हॉन कॉनव्हे याने 56 धावांचं योगदान दिलं. तर इतर फलंदाजांनीही योगदान दिलं. त्यामुळे न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 300 धावा केल्या. टीम इंडियासाठी मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.
त्यानंतर भारताचा कर्णधार शुबमन गिल आणि रोहित शर्मा या दोघांनी 39 धावांची भागीदारी केली. रोहित 26 धावांवर आऊट झाला. त्यानंतर शुबमन आणि विराट कोहली या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी भारताच्या विजयाचा पाया रचला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. दोघांनी 107 बॉलमध्ये 118 रन्सची पार्टनरशीप केली. शुबमनने 71 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 56 रन्स केल्या.
त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या जोडीने 76 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली. विराटच्या रुपात भारताने तिसरी विकेट गमावली. विराटने भारतासाठी सर्वाधिक 93 धावा केल्या. न्यूझीलंडने भारताला 45 धावांच्या मोबदल्यात 4 झटके दिले. विराटनंतर, रवींद्र जडेजा 4, श्रेयस अय्यर 49 आणि हर्षित राणा याने 29 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे भारताची स्थिती 2 आऊट 234 वरुन 6 बाद 279 अशी झाली. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला.
केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने भारताला विजयी केलं. केएलने नाबाद 29 धावा केल्या. तर सुंदर 7 धावांवर नाबाद राहिला. कायले जेमीसन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेत सामना रंगतदार स्थितीत आणला. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.