Cricket : 3 प्रमुख खेळाडूंना दुखापत, तरीही संघात स्थान मिळणार! 11 फेब्रुवारीला पहिला सामना

Icc T20i World Cup 2026 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियाच्या 3 प्रमुख खेळाडूंना दुखापत झालीय. त्यामुळे टीमचं टेन्नश वाढलंय.

Cricket : 3 प्रमुख खेळाडूंना दुखापत, तरीही संघात स्थान मिळणार! 11 फेब्रुवारीला पहिला सामना
Pat Cummins IND vs AUS
Image Credit source: Bcci
| Updated on: Dec 29, 2025 | 9:10 PM

आगामी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. या स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी यजमान टीम इंडियाची घोषणा केली. त्यानुसार टीम इंडियाचं सूर्यकुमार यादव हा नेतृत्व करणार आहे. तर दुसर्‍या बाजूला ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियाच्या एकूण 3 मॅचविनर खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे हे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत फिट होणार की नाही? याबाबत निश्चित काहीच नाही. मात्र त्यानंतरही निवड समिती या त्रिकुटाला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या संभाव्य संघात संधी देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या खेळाडूंना दुखापत?

ऑस्ट्रेलियाचा वनडे आणि टेस्ट कॅप्टन ऑलराउंडर पॅट कमिन्स, वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड आणि ऑलराउंडर टीम डेव्हिड या तिघांची दुखापतीसह झुंज सुरु आहे. हेझलवूड आणि कमिन्स या दोघांना एशेज सीरिजमधून बाहेर व्हावं लागलंय. तर टीम डेव्हिड याला बिग बॅश लिग स्पर्धेत दुखापत झाली. मात्र त्यानंतरही निवड समिती या तिघांना वर्ल्ड कप संघात संधी देण्याच्या तयारीत आहे. भारत आणि श्रीलंकेत 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

पॅट आणि डेव्हीडची दुखापत

रिपोर्ट्सनुसार, पॅटला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेआधी पाठीचे काही मेडीकल रिपोर्ट काढावे लागणार आहेत. पॅटला वेस्ट इंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेनंतर पाठीत दुखापत झाली होती. पॅट तेव्हापासून फक्त एकमेव कसोटी सामना खेळलाय. तर टीम डेव्हिड याला 26 डिसेंबरला दुखापतीमुळे बिग बॅश लीग स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे. टीम ऑस्ट्रेलियाचा प्रमुख खेळाडू आहे. त्यामुळे टीमचं दुखापतीतून लवकर सावरणं ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाचं असणार आहे.

पॅटला संधी मिळणार?

निवड समिती पॅटला 15 सदस्यीय संघात संधी देणार असल्याचं हेड कोच एँड्रयू मॅक्डॉनल्ड यांनी सांगितलंय. ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंटकडून 15 सदस्यीय संघात पॅटचा आयसीसीच्या 2 जानेवारी या मुदतीआधी समावेश केला जाईल. मात्र पॅट उपलब्ध असणार की नाही हे वर्ल्ड कप स्पर्धेआधी ठरवण्यात येईल, असं मॅक्डॉनल्ड यांनी सांगितलं.

तसेच जोश हेझलवूड लवकरच सरावाला सुरुवात करु शकतो. जोशने शेवटच्या टी 20i मालिकेत टीम इंडिया विरुद्ध कडक बॉलिंग केली होती. मात्र जोशला त्यानंतर दुखापतीमुळे एशेज सीरिजमधूनबाहेर व्हावं लागलं.

ऑस्ट्रेलियाचं मिशन टी 20i वर्ल्ड कप

दरम्यान ऑस्ट्रेलिया टी 20i वर्ल्ड कप 2026 या मोहिमेतील आपला पहिला सामना 11 फेब्रुवारीला खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया साखळी फेरीतील पहिल्या 2 सामन्यांत आयर्लंड आणि झिंबाब्वे या संघाविरुद्ध भिडणार आहे.