भारताने हल्ला केलेल्या दहशतवादी ठिकाणांजवळ 18 पाकिस्तानी क्रिकेटपटूंची घरं, झालं असं की…

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 15 दिवसात पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. यात बऱ्याचशा दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. असं असताना भारताने हल्ला केलेल्या 9 ठिकाणांपैकी 7 ठिकाणं अशी आहेत, जिथे 18 पाकिस्तानी क्रिकेटपटू राहतात.

भारताने हल्ला केलेल्या दहशतवादी ठिकाणांजवळ 18 पाकिस्तानी क्रिकेटपटूंची घरं, झालं असं की...
पाकिस्तान क्रिकेटपटू
Image Credit source: मार्क मेटकाफ/गेटी इमेजेस
| Updated on: May 07, 2025 | 4:01 PM

जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे संपूर्ण देशात या हल्ल्याचं प्रत्युत्तर द्यायला हवं, अशी भावना होती. केंद्र सरकार त्या दृष्टीने पावलंही उचलत होतं. अखेर बुधवारी मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हे हल्ले केले. विशेष म्हणजे या भागातून अनेक क्रिकेटपटू उदयास आले आहेत. काही तर पाकिस्तान संघातून आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. तसेच बरेच जण स्थानिक क्रिकेटमध्ये सक्रिय आहेत. भारताने ज्या 9 ठिकाणी हल्ला केला त्यापैकी 7 ठिकाणांहून 18 पाकिस्तानी क्रिकेटपटू येतात. त्यामुळे अशा ठिकाणी दहशतवादी तळ असणं आश्चर्याची बाब आहे.

भारताने मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळावरही क्षेपणास्त्रे डागली. या भागातून शोएब मकसूद, सलमान इर्शाद आणि मोहम्मद हाफीजसारखे क्रिकेटपटू येतात. मोहम्मद हाफीज हा पाकिस्तानच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंपैकी एक आहे. भारताच्या केलेल्या हल्ल्यानंतर त्याने आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर भारताच्या प्रत्युत्तरात्मक हल्ल्याचा निषेध केला आहे. पण याच दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेला हे मात्र विसरला आहे. पाकिस्तानने कायम दहशतवादाला खतपाणी घातलं आहे. त्यामुळेच पाकिस्तानची आज अशी स्थिती आहे.

भारतीय लष्कराने सियालकोटमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि ते ठिकाण उद्ध्वस्त केलं. सियालकोटमधून हसन अली, हारिस सोहेल, शोएब मलिक, बिलाल आसिफ, मोहम्मद अब्बास, एजाज अहमद आणि मुख्तार अहमद यांसारखे पाकिस्तानी क्रिकेटपटू उदयास आले आहेत. या सर्वांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. याशिवाय, सियालकोटमध्ये जन्मलेला सिकंदर रझा सध्या झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळत आहे. बहावलपूर भागातून पाकिस्तानचा महान कसोटी फलंदाज मोहम्मद युसूफ येतो. तसेच अझहर अब्बास आणि आगा सआदत अली देखील इथलेच आहेत.मुरीदके, गुलपूर, भिंबर आणि कोटली येथील दहशतवादी भागातून उमर गुल येतो.