Cricket : दुखापतीमुळे टी 20i सीरिजसह वर्ल्ड कपमधूनही दोघांचा पत्ता कट, तिसऱ्यावर टांगती तलवार

Icc T20i World Cup 2026 : आयसीसी टी 20i वर्ल्ड कपआधी दुखापतीमुळे स्पर्धेतून खेळाडूंची बाहेर होण्याची मालिका सुरु झाली आहे. दुखापतीने एकाच संघातील 2 खेळाडूंचा गेम केलाय. तर तिसऱ्या खेळाडूवर स्पर्धेतून बाहेर होण्याची टांगती तलवार आहे.

Cricket : दुखापतीमुळे टी 20i सीरिजसह वर्ल्ड कपमधूनही दोघांचा पत्ता कट, तिसऱ्यावर टांगती तलवार
Hardik Pandya IND vs SA
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 22, 2026 | 8:59 PM

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहभागी संघांनी सरावाला जोरात सुरुवात केली आहे. या स्पर्धेआधी 20 पैकी बहुतांश संघ हे आपली शेवटची मालिका खेळून सरावाला अंतिम स्वरुप देत आहे. गतविजेता टीम इंडिया मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळत आहे. भारताने या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या बाजूला गतउपविजेता दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप स्पर्धेआधी 27 ते 31 जानेवारीआधी वेस्ट इंडिज विरुद्ध 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. त्याआधी दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका लागला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 2 खेळाडूंना दुखापतीमुळे विंडीज विरूद्धच्या मालिकेसह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतूनही बाहेर व्हावं लागलं आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या संघात 2 बदल

दक्षिण आफ्रिकेच्या टोनी डी झॉर्जी आणि डोनोवन फरेरा या दोघांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावं लागणार आहे. टोनीला भारत दौऱ्यात दुखापत झाली होती. टोनी यातून अद्यापही बरा झालेला नाही. तर डोनोवन याला SA20 स्पर्धेत फिल्डिंग करताना खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे या दोघांना वेस्ट इंडिज विरूद्धच्या मालिकेसह वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं आहे.

दोघांच्या जागी कुणाला संधी?

टोनी डी झॉर्जी आणि डोनोवन फरेरा या दोघांच्या जागी विकेटकीपर बॅट्समन रायन रिकेल्टन आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश करण्यात आला आहे. रायनने टी 20 स्पर्धेत 337 धावा केल्या. तसेच ट्रिस्टन स्टब्स हा दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. मात्र त्यानंतरही निवड समितीने ट्रिस्टनची वर्ल्ड कप संघात निवड केली नव्हती. मात्र अखेर त्याला संधी मिळाली आहे.

डेव्हिड मिलरवर टांगती तलवार

दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक आणि मॅचविनर फलंदाज डेव्हिड मिलर यालाही दुखापतीमुळे विंडीज विरूद्धच्या टी 20I मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. मिलरच्या जागी रुबिन हर्मन याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मिलर वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार की नाही? हे त्याच्या दुखापतीवर अवलंबून असेल, असं क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे स्पष्ट केलं आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाकडून मोठी अपडेट

टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेचा सुधारित संघ : एडन मार्करम (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेव्हीस, क्विंटन डीकॉक, मार्को यान्सेन, जॉर्ज लिंडे, केशव महाराज, क्वेना मफाका, डेव्हीड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिच नॉर्खिया, कगिसो रबाडा, रियान रिक्लेटन, जेसन स्मिथ आणि ट्रिस्टन स्मिथ.