आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणारे टॉप 5 खेळाडू कोण? भारताकडून फक्त….
आशिया कप स्पर्धेला आता काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. अजून भारतीय संघ जाहीर झालेला नाही. त्यात पाकिस्तासोबत खेळणार की नाही हे देखील स्पष्ट नाही. असं असताना आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणाऱ्या टॉप 5 खेळाडूंची नावं समोर आली आहेत. यात फक्त भारताच्या एकाच खेळाडूचं नाव आहे.

आशिया कप स्पर्धेत भारताचा वरचष्मा राहिला आहे. सर्वाधिक वेळा जेतेपदावर नाव कोरण्याचा मान मिळाला आहे. भारताने 1983 पासून आतापर्यंत 8 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. श्रीलंकेने सहा वेळा, तर पाकिस्तानने दोन वेळा चषक मिळवला आहे. तर बांगलादेशला अद्याप जेतेपदाची चव चाखता आलेली नाही. ही स्पर्धा आयसीसी स्पर्धेचं औचित्य साधत टी20 किंवा वनडे फॉर्मेटमध्ये होते. 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप होत असल्याने ही स्पर्धा टी20 फॉर्मेटमध्ये होणार आहे. दुसरीकडे, या स्पर्धेत भारताचा दबदबा असला तरी झेल पकडणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फक्त एक भारतीय आहे. कॅचेस विन मॅचेस या उक्तीप्रमाणे या बाबतीत श्रीलंकेचे खेळाडू वरचढ ठरले आहेत. सर्वाधिक झेल पकडणाऱ्या टॉप 5 खेळाडूंमध्ये तीन खेळाडू हे श्रीलंकेचे आहेत. तर भारत आणि पाकिस्तानचा प्रत्येकी एक खेळाडू आहे.
आशिया कपमध्ये सर्वाधिक झेल घेणारे टॉप 5 खेळाडू
महेला जयवर्धने (श्रीलंका) : श्रीलंकेचा फलंदाज महेला जयवर्धने या यादीत अव्वल स्थानावर आहे. त्याने 2000 ते 2014 पर्यंत खेळलेल्या 28 सामन्यात 15 झेल घेतले आहेत. जयवर्धनेने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर अनेक वेळा संघाला विजय मिळवून दिला आहे.तसेच अडचणींमधून बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
युनूस खान (पाकिस्तान) : पाकिस्तानचा मधल्या फळीतील फलंदाज युनूस खान दुसऱ्या स्थानावर आहे. 2004 ते 2012 पर्यंत त्याने 14 सामन्यांमध्ये 14 झेल घेतले. इतकंच काय तर प्रत्येक डावात एक झेल घेण्याचा विक्रम केला. त्याच्या क्षेत्ररक्षण क्षमतेमुळे विरोधी संघावर दबाव वाढविण्यात खूप मदत झाली आहे.
अरविंदा डी सिल्वा (श्रीलंका) : श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू अरविंद डी सिल्वा याने 1984 ते 2000 या काळात 24 सामन्यांमध्ये 12 झेल घेतले. त्याने फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात आपल्या संघात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
रोहित शर्मा (भारत) : भारताकडून कर्णधार रोहित शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. 2008 ते 2023 पर्यंत 28 सामन्यांमध्ये 11 झेल घेतले आहेत. सामन्यातील निर्णायक क्षणांमध्ये रोहितचे क्षेत्ररक्षण नेहमीच संघासाठी उपयुक्त ठरले आहे.
मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका): या यादीत श्रीलंकेचा आणखी एक दिग्गज खेळाडू म्हणजे मुथय्या मुरलीधरन. त्याने 1995 ते 2010 या काळात 24 सामन्यांमध्ये 10 झेल घेतले. त्याच्या फिरकी जादूसोबतच, मुरलीधरनने क्षेत्ररक्षणातही आपले कौशल्य दाखवले आणि संघाला बळकटी दिली.
