ENG vs IND : वैभव सूर्यवंशीची तोडफोड खेळी, टीम इंडिया विजयी, इंग्लंडवर 4 विकेट्सने मात

England U19 vs India U19 3rd Youth ODI Match Result : इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताला 6 झटके दिले. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला होता. मात्र भारतीय फंलदाजांनी सातव्या विकेटसाठी केलेली भागीदारी निर्णायक ठरली. तसेच वैभव सूर्यवंशी याचं योगदानही विसरुन चालणार नाही.

ENG vs IND : वैभव सूर्यवंशीची तोडफोड खेळी, टीम इंडिया विजयी, इंग्लंडवर 4 विकेट्सने मात
Vaibhav Suryavanshi U19 Team India
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jul 03, 2025 | 3:32 AM

अंडर 19 टीम इंडियाने नियमित कर्णधार आयुष म्हात्रे याच्या अनुपस्थितीत यजमान इंग्लंड अंडर 19 संघावर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 4 विकेट्सने मात केली आहे. पावसामुळे या सामन्यातील 10 षटकांचा खेळ कमी करण्यात आला. श्रीलंकेने 40 षटकंमध्ये 6 विकेट्स गमावून 268 धावा केल्या. त्यामुळे भारताला विजयासाठी 269 धावांचं आव्हान मिळालं. भारतान हे आव्हान अभिज्ञान कुंदु याच्या नेतृत्वात 4 विकेट्स राखून 93 चेंडूंआधी सहज पूर्ण केलं. भारताने 34.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 276 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी याने टीम इंडियाच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तर विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान, आरएस अंब्रिश आणि इतर फलंदाजांनीही निर्णायक योगदान दिलं.

वैभव सूर्यंवंशीची स्फोटक खेळी

भारताने 38 धावांवर पहिली विकेट गमावली. कर्णधार अभिज्ञान कुंदु याने 12 धावा केल्या. त्यानंतर ओपनर वैभव सूर्यवंशी याने विहान मल्होत्रा याच्या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. वैभव सूर्यवंशी याने विहानसह दुसऱ्या विकेटसाठी 24 बॉलमध्ये 73 रन्सची पार्टनरशीप केली. वैभव त्यानतंर आऊट झाला. वैभवने 31 चेंडूमध्ये 86 धावांची ताबडतोड खेळी केली. वैभवने या खेळीत 9 चौकार आणि 6 चौकारांच्या मदतीने आणि 277 च्या स्ट्राईक रेटने 86 धावा केल्या. वैभवने या स्फोटक खेळीसह भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर इतर फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली आणि भारताला विजयी करण्यात योगदान दिलं.

भारताने 11 धावांनंतर तिसरी विकेट गमावली. मौल्यराजसिंह चावडा याला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर विहानच्या रुपात भारताला चौथा धक्का लागला. विहानचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. विहानने 34 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 7 फोरसह 46 रन्स केल्या. राहुल कुमार 35 चेंडूत 27 धावा करुन मैदानाबाहेर गेला. तर हरवंश पांगालिया याने 11 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे भारताची 23.1 ओव्हरनंतर 6 आऊट 199 अशी स्थिती झाली. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. मात्र कनिष्क चौहान आणि आरएस अब्रिंश या जोडीने कमाल केली.

कनिष्क-अब्रिंशचा धमाका

कनिष्क- अब्रिंश या जोडीने सातव्या विकेटसाठी निर्णायक अर्धशतकी भागीदारी केली. या दोघांनी नाबाद 75 धावांची विजयी भागीदारी साकारली. कनिष्कने 42 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह 43 नॉट आऊट रन्स केल्या. तर अंब्रिशने 30 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. आता उभयसंघातील चौथा सामना हा शनिवारी 5 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.