England Tour : इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे खेळणार, पाहा फोटो

U19 Team India Tour Of England 2025 : टीम इंडिया आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडमध्ये पोहचताच कॅप्टन आयुषसोबतचा फोटो शेअर केला आहे.

England Tour : इंग्लंड दौऱ्यात वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे खेळणार, पाहा फोटो
Ayush Mhatre and Vaibhav Suryavanshi England Tour 2025
Image Credit source: Vaibhav Suryavanshi Instagram
| Updated on: Jun 22, 2025 | 5:27 PM

सिनिअर टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत शुबमन गिल याच्या नेतृत्वात अप्रतिम सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या त्रिकुटाने शतक झळकावलं. त्यानंतर आता अंडर 19 टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. अंडर 19 इंडिया टीम इंग्लंडमध्ये पोहचली आहे. भारताचा 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडमध्ये पोहचल्यानंतर काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. अंडर 19 टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 5 एकदिवसीय आणि 2 मल्टी डे मॅचेस खेळणार आहे.

अंडर 19 टीम इंडिया 27 जून ते 7 जुलै दरम्यान एकूण 5 एकदिवसीय सामने खेळणार आहे. तर त्यानंतर अंडर 19 टीम इंडिया 12 ते 23 जुलै दरम्यान 2 चार दिवसीय सामने खेळणार आहे. त्याआधी 24 जून रोजी एकदिवसीय सराव सामना खेळणार आहे. मराठमोळा 17 वर्षीय आयुष म्हात्रे या दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.

वैभवकडून फोटो शेअर

वैभवने इंग्लंडमध्ये पोहचल्यानतंर काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. वैभवने प्रवासादरम्यानचा एक फोटो, जेवणाचा एक फोटो आणि कॅप्टन आयुष म्हात्रे याच्यासोबतचा फोटो टाकला आहे. वैभव आणि आयुष या युवा खेळाडूंनी आयपीएलच्या 18 व्या मोसमातून पदार्पण केलं. वैभवने राजस्थान रॉयल्सचं तर आयुषने चेन्नई सुपर किंग्सचं प्रतिनिधित्व केलं. या दोघांनीही पदार्पणातील मोसम चांगलाच गाजवला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

राजस्थान रॉयल्सने वैभवला 1 कोटी 10 लाख रुपयांमध्ये करारबद्ध केलं. वैभवने या हंगामात 7 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह एकूण 252 धावा केल्या. वैभव या दरम्यान आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

वनडे सीरिज

27 जून, शुक्रवार, पहिला एकदिवसीय सामना

30 जून, सोमवार, दुसरा एकदिवसीय सामना

2 जुलै, बुधवार, तिसरा एकदिवसीय सामना

5 जुलै, शनिवार, चौथा एकदिवसीय सामना

7 जुलै, सोमवार, पाचवा एकदिवसीय सामना

मल्टी डे मॅच

12 ते 15 जुलै, पहिला सामना

20 ते 23 जुलै, दुसरा सामना

अंडर 19 टीम इंडियाची युवा जोडी

आयुष म्हात्रे

आयुष म्हात्रे यानेही आयपीएल 2025 मध्ये वैभव सूर्यवंशी याच्यासारखीच कामगिरी केली. आयुषने 7 सामन्यांमध्ये 240 धावा केल्या. त्यानंतर आयुषला इंग्लंड दौऱ्यासाठी अंडर 19 संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता आयुष या दौऱ्यात कर्णधार आणि फलंदाज म्हणून कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. तसेच वैभवकडूनही आयपीएलसारखीच खेळी अपेक्षित असणार आहे.