
IND vs ZIM U19 World Cup: अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये टीम इंडिया सुपर सिक्सच्या टप्प्यात पहिला सामना झिम्बाब्वेसोबत खेळत आहे. बुलावायो येथील क्वींस स्पोर्ट्स क्लब स्टेडियममध्ये हे सामने सुरू आहेत. या सामन्यात 14 वर्षांचा तरुण धमाकेदार वैभव सूर्यवंशीने एक स्फोटक खेळी खेळली. झिम्बाब्वे अंडर-19 टीमने नाणे फेक जिंकली आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज हे सलामीवीर म्हणून उतरले. दोघांनी पहिल्या विकेटपर्यंत 44 धावांची खेळी खेळली. एरॉन जॉर्ज हा 23 धावा ठोकून तंबूत परतला. पण वैभव हा पीचवर टिकून होता. यावेळी त्याने दमदार फलंदाजी केली. तुफान फटके लगावले.
वैभवने गोलंदाजांची केली धुलाई
वैभव सूर्यवंशी केवळ चौकार आणि षटकारच ठोकण्यासाठी आलाय की काय असा प्रश्न झिम्बाब्वे संघाला पडला होता. त्यामुळे गोलंदाज दबावाखाली आले. पाचव्या षटकात तर मैदानावर टशन सुरू झाली. वैभववर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न झिम्बाब्वे संघाने सुरू केला. यावेळी हायहोल्टेड ड्रामा दिसला. सूर्यवंशीने झिम्बाब्वेविरोधात मोर्चा उघडला. त्याच्या फटकेबाजीने गोलंदाज घामाघूम झाले. वेगवान गोलंदाज पनाशे मजाई च्या पाचव्या चेंडूवर वैभवने उत्तुंग षटकार ठोकला. चेंडू थेट स्टेडियम बाहेर पडला. हा चेंडू शोधण्यासाठी बराच वेळ लागला.
पनाशे मजाईला दाखवले आस्मान
वैभव सूर्यवंशी याने पनाशे मजाईला दिवसा तारे दाखवले. त्याच्या चेंडूवर उत्तुंग षटकार झोडला. तरीही पनाशे हा त्याला खिजवत होता. त्याला टशन दाखवत होता. मग वैभवने पनाशेची झिंग चांगलीच उतरवली. त्याची मस्ती जिरवली. पनाशे खडूसपणा करत होता. त्याला वैभवने त्याच्या पुढच्या षटकात उत्तर दिले. मजाईच्या पुढील षटकात वैभवने 2 षटकार आणि एक चौकार ठोकला. त्या षटकात वैभवने 18 धावा वसूल केल्या.
वैभव सूर्यवंशीच्या 52 धावा
झिम्बाब्वेविरोधात वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. तो मोठी शतकी खेळी खेळेल असं वाटत असतानाच 30 चेंडूत अवघ्या 52 धावांवर तो बाद झाला. त्याने 24 चेंडूत अर्धशतक ठोकले. या कालावधीत या 14 वर्षीय तरूणाने 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तर कर्णधार आयुष म्हात्रे याला मोठी खेळी करता आली नाही. तो 21 धावांवर बाद झाला. त्याला कधी सूर गवसणार ही चिंता संघाला सतावत आहे. त्याने लवकर जबरदस्त कामगिरी केली तर वैभव आणि तो मिळून एक चांगला इतिहास रचू शकतात, असे क्रिकेट प्रेमींना वाटते.