Asia Cup 2025 : आशिया कपसाठी टीमची घोषणा, तब्बल 25 खेळाडूंचा समावेश, कुणाला संधी?

Asia Cup 2025 Preliminary Squad Of Bangaldesh : क्रिकेट विश्वातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आगामी आशिया कप 2025 स्पर्धेसाठी बांगलादेशने 25 सदस्यीय प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. जाणून घ्या.

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी टीमची घोषणा, तब्बल 25 खेळाडूंचा समावेश, कुणाला संधी?
IND vs BAN T20i Series Suryakumar Yadav
Image Credit source: Bcci
| Updated on: Aug 05, 2025 | 4:29 PM

टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची सांगता विजयाने केली. भारताने केनिंग्टन ओव्हलमध्ये झालेल्या सामन्यात 6 धावांनी थरारक विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. आता टीम इंडिया महिन्याभराच्या विश्रांतीनंतर थेट सप्टेंबर महिन्यात मैदानात उतरणार आहे. टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर जाणार होती. मात्र बीसीसीआयने बांगलादेश दौरा वर्षभरासाठी स्थगित केला. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना बहुप्रतिक्षित आशिया कप 2025 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्याआधी बांगलादेश क्रिकेट टीमच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने नेदरलँड विरुद्ध होणाऱ्या टी 20i मालिकेसाठी आणि आशिया कप स्पर्धेसाठी प्राथमिक संघाची घोषणा केली आहे. निवड समितीने या प्राथमिक संघात 25 खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच लिटन दास याला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नेदरलँड विरूद्धच्या टी 20i मालिकेतील कामगिरीव काही खेळाडूंना आशिया कपसाठी मुख्य संघात संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंचा नेदरलँड विरुद्ध चमकदार कामगिरी करत आशिया कपसाठी दावा मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.

नूरुल हसन याला संधी

क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, या प्राथमिक संघात नूरुल हसन याला संधी देण्यात आली आहे. नुरूल याने गेल्या काही महिन्यांत सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे नुरूलला ही संधी मिळाली आहे. तसेच मेहदी हसन मिराज यालाही संधी मिळाली आहे. मिराजला श्रीलंका आणि अफगाणिस्तान विरूद्धच्या टी 20i मालिकेत काही विशेष करता आलं नव्हतं. मात्र त्यानंतरही मिराजला संघात कायम ठेवण्यात आलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशचे खेळाडू 6 ऑगस्टला मीरपूरमधील एसबीएनसीएस कॅम्पमध्ये एकत्र जमतील. त्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत बांगलादेशचे खेळाडू सराव सत्रात तयारी करतील. त्यानंतर साल्हेटमध्ये 20 ऑगस्टपासून सराव कॅम्प आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर नेदलँड्स विरूद्धच्या टी 20i मालिकेचा थरार 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान रंगणार आहे.

आशिया कप 2025

त्यानंतर 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान यूएईमध्ये आशिया कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. बांगलादेश टीम बी ग्रुपमध्ये आहे. तसेच बांगलादेश व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँगचा समावेश आहे.

नेदरलँड विरुद्धच्या टी 20i मालिका आणि आशिया कप स्पर्धेसाठी प्राथमिक संघ : लिटन दास (कर्णधार), तंजीद हसन तमीम, मोहम्मद नईम शेख, सौम्य सरकार, मोहम्मद परवेज हुसैन इमोन, मोहम्मद ताहिद हृदोय, जेकर अली, मोहम्मद मेहदी हसन मिराज, शमीम हुसैन, नजमुल हुसेन शांतो, मोहम्मद रिशाद हुसेन, शाक महेदी हसन, मोहम्मद तनवीर इस्लाम, नसुम अहमद, हसन महमूद, तस्कीन अहमद, मोहम्मद तंजीम हसन साकिब, मोहम्मद सैफुद्दीन, नाहिद राणा, मुस्तफिजुर रहमान, मोहम्मद शोरफुल इस्लाम, सैयद खालिद अहमद, काजी नुरुल हसन सोहन, महिदुल इस्लाम भुइयां अंकोन आणि मोहम्मद सैफ हसन.