VHT 2025: वैभव सूर्यवंशीला मोठा धक्का, विजय हजारे ट्रॉफीतून युवा फलंदाज बाहेर, नक्की काय झालं?

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्याच सामन्यानंतर दिल्लीला रवाना झाला. आता वैभवला या स्पर्धेतील सर्व सामन्यांना मुकावं लागणार आहे. वैभव आता खेळताना दिसणार? जाणून घ्या.

VHT 2025: वैभव सूर्यवंशीला मोठा धक्का, विजय हजारे ट्रॉफीतून युवा फलंदाज बाहेर, नक्की काय झालं?
Vaibhav Suryavanshi VHT
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 25, 2025 | 5:59 PM

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही धमाका सुरु ठेवला आहे. वैभव आयपीएलच्या 18 व्या मोसमापासून सातत्याने खोऱ्याने धावा करत आहे. वैभव आतापर्यंत ज्या ज्या प्रकारात खेळलाय त्या त्या प्रकारात त्याने आपली छाप सोडली आहे. वैभवने आयपीएल, युथ ओडीआय, युथ टेस्ट, अंडर 19 टीम इंडिया आणि त्यानंतर आता लिस्ट ए क्रिकेटमध्येही धमाका केलाय. वैभवने बुधवारी 24 डिसेंबरला विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धेत धमाकेदार शतक झळकावलं. मात्र त्यानंतर आता वैभवला या स्पर्धेतील उर्वरित सामने खेळता येणार नाहीत. भारताच्या या 14 वर्षीय युवा फलंदाजावर या स्पर्धेतून बाहेर होण्याची वेळ आहे.

वैभवचं या उर्वरित स्पर्धेतून बाहेर होण्यामागे दुखापत हे कारण नाही. तर वैभवचा सन्मान केला जाणार आहे. वैभवला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्यासाठी वैभव पहिल्या सामन्यानंतर दिल्लीला पोहचला आहे.

वैभवचा शतकी तडाखा, वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

वैभवने बुधवारी बिहारकडून खेळताना अरुणाचल प्रदेश विरूद्धच्या सलामीच्या सामन्यात धमाका केला. वैभवने अरुणाचल प्रदेश विरुद्ध तोडफोड खेळी साकारली. वैभवने 200 पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटने अवघ्या 84 बॉलमध्ये 190 रन्सची चाबूक खेळी केली. वैभवने या खेळीदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबीडी व्हीलीयर्स याचा रेकॉर्ड ब्रेक केला. वैभवने फक्त 59 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या. वैभवने यासह एबीचा सर्वात वेगवान दीडशतक करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला.

वैभवसह इतर सहकाऱ्यांनीही बिहारसाठी शतक झळकावलं. बिहारने अशाप्रकारे 574 धावांचा डोंगर उभारला. त्यामुळे बिहारला सहज विजय मिळवता आला. मात्र आता बिहारला आगामी सामन्यात वैभवशिवाय खेळावं लागणार आहे. केंद्र सरकारकडून वैभवला शुक्रवारी 26 डिसेंबरला राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा राष्ट्रपती भवनात पार पडणार आहे. वैभव या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.

अंडर 19 टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा

वैभवला या सन्मानानंतरही बिहार टीमसाठी खेळता येणार नाही. अंडर 19 टीम इंडिया जानेवारी 2026 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. सर्व खेळाडू 30 डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहेत.

वैभव 4 जानेवारीला ऑन फिल्ड

अंडर 19 टीम इंडिया 4 ते 9 जानेवारी दरम्यान एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आगामी अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका फार महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे आता वैभव थेट 4 जानेवारीला खेळताना दिसणार आहे.