
विदर्भाने अक्षय वाडकर याच्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी उंचावली आहे. रणजी ट्रॉफी 2024-2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात विदर्भ विरुद्ध केरळ आमनेसामने होते. करुण नायर याच्या शानदार बॅटिंगच्या जोरावर विदर्भाने नागपुरात घरच्या मैदानात केरळवर एकतर्फी विजय मिळवला. उभयसंघातील सामना हा अनिर्णित राहिला. मात्र विदर्भ पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजेता ठरला. विदर्भाची ही रणजी ट्रॉफी जिंकण्याची तिसरी वेळ ठरली. विदर्भाने याआधी 2017-2018 आणि 2018-2019 साली रणजी ट्रॉफी खिताब जिंकला होता. त्यानंतर आता 4 वर्षांनंतर विदर्भाने पुन्हा एकदा या ट्रॉफीवर नाव कोरलं. विदर्भाने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील या हंगामात एकही सामना गमावला नाही.
विदर्भाने केरळविरुद्ध दोन्ही डावात अप्रतिम फलंदाजी केली. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने 9 विकेट्स गमावून 375 धावा केल्या होत्या. करुण नायर याने दोन्ही डावात उल्लेखनीय खेळी केली. करुणने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली. सामन्यात काय काय झालं? हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात.
केरळने टॉस जिंकून विदर्भाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. विदर्भाने पहिल्या डावात 379 धावा केल्या. विदर्भासाठी दानिश मलेवार याने सर्वाधिक 153 धावांचं योगदान दिलं. तर करुण नायर याने 86 धावा केल्या. केरळकडून एमडी निधीश आणि ईडन ऍपल टॉम या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर बासिल याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर जलज सक्सेन याने 1 विकेट घेतली.
केरळला विदर्भाच्या 379 धावांच्या प्रत्युत्तरात 342 धावाच करता आल्या.केरळकडून कॅप्टन सचिन बेबी याने सर्वाधिक धावा केल्या. सचिन बेबी याचं शतक अवघ्या 2 धावांनी हुकलं. सचिनने 98 धावा केल्या. तर आदित्य सरवटे याने 79 धावांचं योगदान दिलं. विदर्भाकडून दर्शन नळकांडे, हर्ष दुबे आणि पार्थ रेखाडे या त्रिकुटाने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या. तर यश ठाकुर याने 1 विकेट घेतली.
केरळला 342 धावावंर रोखल्याने विदर्भाला 37 धावांची आघाडी मिळाली. विदर्भाने पाचव्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसऱ्या डावात 143.5 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 375 धावा केल्या. विदर्भाकडून दुसऱ्या डावात करुण नायर याने 295 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 10 फोरसह सर्वाधिक 135 रन्स केल्या. दानिशने 73 आणि दर्शनने 51 धावांची खेळी केली. तर इतरांनीही योगदान दिलं. तर केरळसाठी आदित्य सरवटे याने दुसऱ्या डावात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.तर इतर 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
विदर्भ प्लेइंग इलेव्हन : अक्षय वाडकर (कर्णधार आणि विकेटकीपर), ध्रुव शौरे, दानिश मलेवार, करुण नायर, यश राठोड, अक्षय कर्णेवार, हर्ष दुबे, पार्थ रेखाडे, नचिकेत भुते, दर्शन नळकांडे आणि यश ठाकूर.
केरळ प्लेइंग इलेव्हन : सचिन बेबी (कर्णधार), अक्षय चंद्रन, रोहन कुन्नम्मल, जलज सक्सेना, मोहम्मद अझरुद्दीन (विकेटकीपर), सलमान निझार, अहमद इम्रान, ईडन ऍपल टॉम, आदित्य सरवटे, एमडी निधीश आणि नेदुमनकुझी बेसिल.