
टीम इंडियाच्या खेळाडूंनी काल मुंबईत जे अनुभवलं, ते क्षण ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. मागच्या शनिवारी बार्बाडोसमध्ये दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर टीम इंडियासह समस्त भारताने आंनदोत्सव साजरा केलाच. पण टीम इंडिया मायदेशी परतल्यानंतर जे क्षण सगळ्या देशाने अनुभवले ते कधीच विसरता येणार नाहीत. बार्बाडोसमध्ये आलेल्या हेरिकन बेरिल चक्रीवादळामुळे प्रतिक्षा काही दिवस लांबली. पण काल गुरुवारी पहाटे पाच दिवसांनी टीम इंडिया मायभूमीत दाखल झाली. नवी दिल्लीत स्पेशल फ्लाइटने लँड झाल्यानंतर टीमने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यांच्याशी वर्ल्ड कपमधले अनुभव शेअर केले.
त्यानंतर संध्यााकळी टीम इंडियात मुंबईत दाखल झाली. मुंबईत ट्रायडंट हॉटेलपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत व्हिक्ट्री परेड ठेवण्यात आली होती. यावेळी जणू संपूर्ण मुंबापुरीच ट्रायडंट ते वानखेडे पर्यंतच्या मार्गावर लोटल्याच चित्र होतं. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी जे प्रेम, माया अनुभवली, ते क्षण ते कधीच विसरणार नाहीत. मिरवणूक मार्ग पूर्ण करुन टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये दाखल झाली, तेव्हा सुद्धा एक वेगळं चित्र होतं. स्टेडियमधील प्रत्येक चेअरवर टीम इंडियाचे चाहते आसनस्थ होते. ‘भारत माता की जय’ चा जयघोष सुरु होता. स्टेडियममधील वातावरण एकदम देशभक्तीने भरलेलं होतं. 2011 साली एमएस धोनीच्या टीमने वानखेडेवर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर जे क्षण अनुभवले, तेच क्षण रोहित शर्माच्या टीमच्या वाट्याला आले.
वंदे मातरम 🇮🇳 pic.twitter.com/j5D4nMMdF9
— BCCI (@BCCI) July 4, 2024
‘माँ तुझे सलाम’
T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचा काल क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाडूनी अख्ख्या स्टेडियमला फेरी मारताना चाहत्यांच प्रेम, अभिवादव स्वीकारलं. यावेळी टीम इंडियासोबत अख्ख्या स्टेडियमने एआर रहमान यांचं प्रसिद्ध गाणं ‘माँ तुझे सलाम’ हे गाण गायलं. अख्खा स्टेडियमने ‘वंदे मातरम’ म्हटलं, त्या क्षणाचा व्हिडिओ पाहताना अंगावर अक्षरक्ष: शहारे येतात.