
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदापासून दोन पावलं दूर आहे. उपांत्य फेरीत भारताने आधीच स्थान मिळवलं आहे. त्यामुळे उपांत्य आणि अंतिम फेरी असं ते गणित आहे. न्यूझीलंडविरुद्धचा साखळी फेरीतील तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. त्यामुळे टीम इंडिया निवांत आहे. दुसरं म्हणजे पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाला सहा दिवसांचा आराम देखील मिळाला आहे. न्यूझीलंडविरुद्धचा सामना 2 मार्चला होणार आहे. त्यामुळे या ब्रेकमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंनी आरामानंतर सराव सुरु केला आहे. पण टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएलच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे कोहलीवर बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं आरोप होत आहे. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात विराट कोहलीने चमकदार कामगिरी केली होती. या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकलं होतं. त्यामुळे विराट कोहलीचा हुरूप वाढला आहे. असं असताना विराट कोहली आयपीएल 2025 स्पर्धेशी निगडीत एक काम पूर्ण केल्याची चर्चा आहे.
विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात विराट कोहली आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची जर्सी परिधान करून दिसत आहे. या फोटो दुबईच्या हॉटेलमधील असल्याचा दावा केला आहे. यावेळी तो आयपीएल 2025 पर्वासाठी जाहीरातीचं शूटिंग करत होता. हे फोटोशूट जियोस्टारसाठी होतं, अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. असं असताना बीसीसीआयचा नियम मोडल्याची चर्चा आहे. मागच्या महिन्यात बीसीसीआयने एक नियमावली जाहीर केली होती. यात मालिका किंवा स्पर्धेदरम्यान कोणीही वैयक्तिक किंवा कमर्शिअल जाहिरातीचं शूटिंग करणार नाही असं सांगितलं होतं. पण आयपीएल ही बीसीसीआयची स्पर्धा असून अधिकृत ब्रॉडकास्टरसाठी शूट केलं. त्यामुळे नियमाचा भंग झालेला नाही.
Virat Kohli at the RCB shoot for JioHotstar! pic.twitter.com/lvKLLrIxpl
— RCBIANS OFFICIAL (@RcbianOfficial) February 26, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर आयपीएलच्या 18व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघासोबत खेळणार आहे. बंगळुरुचं नेतृत्व यावेळी रजत पाटीदार याच्याकडे आहे. त्याच्या नेतृत्वात आरसीबीला पहिलं जेतेपद मिळेल का? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.