
आशिया कप स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. 9 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला ओमानविरुद्ध होणार आहे. दुसरा सामना 14 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध आणि तिसरा सामना 14 सप्टेबरला युएईविरुद्ध खेळणार आहे. या तिन्ही सामन्यात भारताची बाजू भक्कम दिसत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. या संघात शुबमन गिलला देखील स्थान मिळालं आहे. त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी असून त्याच्याकडून फार अपेक्षा आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाने भारताच्या तीन खेळाडूंची नाव गेमचेंजर म्हणून घेतली आहे. यात त्याने सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिलला डावललं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. वीरेंद्र सेहवागने गेमचेंजर म्हणून युवा ओपनर अभिषेक शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यांचं नाव घेतलं आहे.
वीरेंद्र सेहवाने सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘मला वाटते की अभिषेक शर्मा गेमचेंजर ठरू शकतो. बुमराह कायम गेमचेंजर राहिला आहे. वरुण चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत फायद्याचा ठरला होता. तसेच टी20 फॉर्मेटमध्ये घातक गोलंदाज आहे. माझ्यासाठी हे खेळाडू गेमचेंजर आहेत. हे तिघं सामना जिंकवू शकतात.’ वीरेंद्र सेहवागने या तिघांची नावं घेतली आहेत. पण या तिघांपैकी दोघांची नावं प्लेइंग 11 मध्ये जवळपास निश्चित आहेत. पण वरूण चक्रवर्ती की कुलदीप यादव असं समीकरण असणार आहे. त्यामुळे प्लेइंग 11 कडे लक्ष लागून आहे.
जसप्रीत बुमराहने मागच्या वर्षी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भेदक गोलंदाजी केली होती. त्याने 15 विकेट घेतल्या होत्या. त्याच्या कामगिरीमुळे भारताला विजय मिळवणं सोपं झालं. त्याने 70 टी20 सामन्यात 89 विकेट घेतल्या आहेत. तर अभिषेक शर्माने 17 टी20 सामन्यात 33.43 च्या सरासरीने 535 धावा केल्या आहेत. यात दोन शतकं आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. यात 135 हा त्याचा बेस्ट स्कोअर आहे. तर वरुण चक्रवर्तीने 18 टी20 सामन्यात 14.57 च्या सरासरीने 33 विकेट घेतल्या आहे. आता हे तिन्ही खेळाडू आशिया कप स्पर्धेत कशी कामगिरी करतात याकडे लक्ष लागून आहे.