WCL 2025: ही क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी सोनेरी जर्सी, जाणून घ्या खासियत
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या जर्सीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण ही क्रिकेट जर्सी क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी जर्सी आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत दिग्गज खेळाडू खेळण्यासाठी मैदानात उतरतात. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावलौकीक मिळवलेल्या खेळाडूंना पुन्हा पाहण्याची संधी क्रीडा रसिकांना मिळते. ही स्पर्धा 18 जुलैपासून सुरु झाली असून 2 ऑगस्टला अंतिम सामना असणार आहे. एकूण सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा बर्मिंगहॅम, नॉर्थम्प्टन, लीसेस्टर आणि लीड्स येथे आयोजित केले जाईल. वेस्ट इंडिजच्या जर्सीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लंडनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स (WCL) 2025 स्पर्धेसाठी खास डिझाइन केलेली ही जर्सी 18 कॅरेट सोन्याने मढवलेली आहे. ही अनोखी जर्सी “लोरेन्झ” नावाच्या कंपनीने डिझाइन केली आहे. ही जर्सी 30 ग्रॅम, 20 ग्रॅम आणि 10 ग्रॅम सोन्याच्या प्रकारात उपलब्ध असेल. ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड आणि डीजे ब्राव्हो सारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेला वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघ क्रिकेटच्या जगात एका नवीन अध्यायाची सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे.
लॉरेन्झचे संस्थापक राज करण दुग्गल म्हणाले की, ही जर्सी केवळ एक टीशर्ट नाही तर वेस्ट इंडिज क्रिकेटच्या समृद्ध इतिहासाला आणि त्याच्या दिग्गजांना आदरांजली आहे. “ही जर्सी एक इतिहास आहे. शाही कारागिरी, सांस्कृतिक अभिमान आणि क्रीडा कौशल्याचे मिश्रण असलेली, लॉरेन्झ जर्सी क्रीडा क्षेत्रातील लक्झरीचे जागतिक प्रतीक म्हणून उभी आहे,” असं त्यांनी पुढे सांगितलं. वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघाचे मालक असलेले अजय सेठी म्हणाले, “वेस्ट इंडिज चॅम्पियन्समध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. ही जर्सी वेस्ट इंडिज क्रिकेटमधील सर्व दिग्गजांना एक योग्य आदरांजली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स ही जगातील सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धांपैकी एक आहे आणि यावर्षी आम्ही ट्रॉफी जिंकण्याचे ध्येय ठेवतो.”
वेस्ट इंडिज चॅम्पियन्सचा पहिला सामना 19 जुलैला दक्षिण अफ्रिका चॅम्पियन्ससोबत होणार आहे. त्यानंतर 22 जुलैला इंग्लंडविरुद्ध, 23 जुलैला ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 26 जुलैला पाकिस्तान विरुद्ध, 29 जुलैला भारताविरुद्ध असणार आहे. एकूण सहा संघ आहेत. यापैकी टॉप 4 मध्ये असलेले संघ उपांत्य फेरीसाठी निश्चित होतील. तर उर्वरित दोन संघ साखळी फेरीनंतर बाद होतील. मागच्या पर्वात भारताने जेतेपद जिंकलं होतं.
