IND vs NAM: नामिबियाच्या कर्णधाराचा आयसीसीवर गंभीर आरोप, भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी अन्याय!

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि नामिबिया हे संघ भिडणार आहेत. या सामन्यात भारताचं पारडं जड आहे. असं असताना नामिबियाचा कर्णधाराने गंभीर आरोप केले आहेत. टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात अन्याय झाल्याची भाषा केली आहे.

IND vs NAM: नामिबियाच्या कर्णधाराचा आयसीसीवर गंभीर आरोप, भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी अन्याय!
IND vs NAM: नामिबियाच्या कर्णधाराचा आयसीसीवर गंभीर आरोप, भारताविरूद्धच्या सामन्यात अन्याय!
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 11, 2026 | 9:44 PM

India vs Namibia: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडियाला विजयाची आवश्यकता आहे. भारताचा सामना नामिबियाशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर पाकिस्तानविरुद्धची लढत सोपी जाईल. नाही तर जिंकण्याचा भार डोक्यावर ठेवून लढावं लागेल. कारण पाकिस्तानने यापूर्वीच दोन सामने जिंकले आहे. तर भारताने पहिला सामना जिंकला असून दुसरा सामना नामिबियाशी आहे. असं असताना नामिबियाच्या कर्णधाराने आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे या सामन्यापूर्वी चर्चांना उधाण आलं आहे. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस याने आयसीसीला एक प्रश्न विचारला आहे. भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी एकही नाईट सराव सेशन का ठेवलं नाही? असा प्रश्न त्याने विचारला आहे. भारताला फ्लडलाइट्समध्ये दोन सराव सेशन दिले. तर नामिबियाने फक्त दिवसाच सराव केला.

नामिबियाचा कर्णधार इरास्मसने भारताला फायदा देण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्याने सांगितलं की, ‘या सामन्यापूर्वी आम्हाला फ्लड लाइट्समध्ये कोणतंही सराव सेशन का दिलं गेलं नाही. मला त्याचा कारण माहिती नाही. पण माझ्या मते, भारताला दोन नाइट सेशन दिले. तुम्ही याच काय अर्थ काढायचा तो काढा.’ त्यामुळे आयसीसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यापूर्वीच या स्पर्धेतील पेच सोडवताना आयसीसीच्या नाकी नऊ आले आहेत. आता नामिबियाच्या कर्णधार प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे.

नामिबियात रात्री क्रिकेट खेळण्याची सोय नाही. कारण या देशातील स्टेडियममध्ये फ्लड लाईट्स नाहीत. त्यामुळे सराव किंवा सामने रात्री खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नामिबियाच्या खेळाडूंना डे नाईट सामने खेळण्याचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे भारताविरुद्ध नाईट सामना खेळताना अडचणीचा सामना करावा लागेल. पण असं असताना नामिबियाचा कर्णधार इरास्मसने सांगितलं की, आम्ही पूर्ण शक्तिनिशी भारताचा सामना करू. नामिबियाचा अष्टपैलू जॉन इटोनने सांगितलं की, ‘भारतात खेळणं मोठी बाब आहे आणि भारतीय संघावरच दडपण असेल. पण घरच्या मैदानावर प्रेक्षकांची साथ असल्याने त्यांना फायदाही होईल. आमच्याकडे गमवण्यासाठी काहीच नाही. आम्ही आमचं सर्वोत्तम देऊ आणि सामना करू.’

Follow Us