ENG vs IND : कॅप्टन शुबमनने पराभवानंतर फलंदाजांवर खापर फोडलं, म्हणाला..

Shubman Gill ENG vs IND 1st Test : भारतीय क्रिकेट संघाला लीड्समध्ये इंग्लंड विरुद्ध पराभूत व्हावं लागलं. या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल काय म्हणाला? जाणून घ्या.

ENG vs IND : कॅप्टन शुबमनने पराभवानंतर फलंदाजांवर खापर फोडलं, म्हणाला..
Shubman Gill Team India Post Match
Image Credit source: Social Media
| Updated on: Jun 25, 2025 | 1:03 AM

टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन शुबमन गिल याने इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यातील पराभवासाठी गचाळ फिल्डिंग आणि अपवाद वगळता इतर फलंदाजांना दोषी ठरवलं आहे. अनेक संधी मिळाल्या, मात्र त्याचा फायदा घेता आला नाही, असं शुबमनने म्हटलं. टीम इंडियाला लीड्समध्ये 5 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने 371 धावांचं आव्हान हे 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. इंग्लंडच्या विजयात बेन डकेट याने प्रमुख भूमिका बजावली. बेन डकेट याने शतकी खेळी केली. तर झॅक क्रॉली आणि जो रुट या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. इंग्लंड यासह कसोटीत दुसऱ्या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करण्यात यशस्वी ठरली. तर भारताला 5 शतकं केल्यानतंर पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

टीम इंडियाची दोन्ही डावात घसरगुंडी

टीम इंडियासाठी पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत या तिघांनी शतक केलं. मात्र शेवटच्या 7 विकेट्स या 41 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. तर दुसर्‍या डावात केएल राहुल आणि ऋषभने दुसऱ्या डावात शतक केलं. मात्र टीम इंडियाने दुसऱ्या डावातही 31 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स टाकल्या. टीम इंडियाला पहिल्या डावात 500 पेक्षा अधिक धावा करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने 471 धावांवर रोखलं. तर दुसऱ्या डावात 400 पेक्षा अधिक धावांची आघाडी मिळवण्याची संधी होती. मात्र 364 धावांवर बाजार उठला.

पराभवानंतर कॅप्टन गिल याची प्रतिक्रिया

“एक शानदार सामना राहिला.आमच्याकडे संधी होती. आम्ही कॅचेस सोडल्या, खालील क्रमातील फलंदाज धावा करण्यात अपयशी ठरले. मात्र मला माझ्या संघावर गर्व आहे. एकूणच चांगला प्रयत्न केला. आम्ही 430 च्या आसपास धावा करुन डाव घोषित करु असं, आम्ही काल विचार करत होतो. मात्र दुर्देवाने आम्ही तसं करु शकलो नाहीत. त्यामुळे कायम त्रास होतो. यावेळेस आम्ही धावा करु शकलो नाहीत. आगामी सामन्यांमध्ये आम्ही यात सुधारणा करु”, असा विश्वास शुबमनने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान व्यक्त केला.

भारतीय संघाच्या पराभवाचं आणखी एक मोठं कारण म्हणजे गचाळ फिल्डिंग आणि कॅचेस सोडणं.टीम इंडियाने या सामन्यात 7-8 कॅचेस सोडल्या. यावरूनही शुबमनने प्रतिक्रिया दिली. “अशाप्रकारच्या खेळपट्टीवर विकेट सहजासहजी मिळत नाहीत. मात्र आमची युवा टीम आहे. ते यातून शिकतील. आशा आहे की आम्ही सुधारणा करु. आम्ही पहिल्या सत्रात चांगली बॉलिंग केली. सहजासहजी धावा दिल्या नाहीत. मात्र चेंडू जेव्हा जुना होतो तेव्हा धावा रोखणं अवघड होतं. जेव्हा चेंडू मऊ होतो तेव्हा विकेट घेणे गरजेचं असतं”, असंही शुबमन गिल याने म्हटलं.