WENG vs WIND : वूमन्स टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, इंग्लंडवर 24 धावांनी मात
England Women vs India Women 2nd T20I Match Result : भारतीय महिला क्रिकेट संघाने 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत सलग दुसरा सामना जिंकला आहे. भारताने यासह 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

स्मृती मंधाना हीने हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत भारताला इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या टी 20i मालिकेतील पहिल्या सामन्यात 97 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवून दिला. त्यानंतर दुसऱ्या टी 20i सामन्यातून नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीने कमबॅक केलं आणि भारताला 5 सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरा विजय मिळवून दिला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडवर 24 धावांनी मात केली आहे. भारताने इंग्लंडसमोर 182 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 157 धावांपर्यंतच पोहचता आलं. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाची कडक फिल्डिंग
भारतीय खेळाडूंनी या सामन्यात अप्रतिम फिल्डिंग केली. भारताने 7 पैकी 3 विकेट्स या रन आऊटद्वारे मिळवल्या. इंग्लंडच्या सलामी जोडीला भारतीय गोलंदाजांनी झटपट आऊट केलं. सलामी जोडीने प्रत्येकी 1-1 धाव करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर कॅप्टन नेट सायव्हर ब्रँट हीलादेखील फार वेळ मैदानात थांबता आलं नाही. नेट 13 रन्स करुन आऊट झाली.
चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
त्यानंतर टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्स या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन इंग्लंडच्या विजयाचा आशा कायम ठेवल्या. या दोघींनी चौथ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर टॅमी चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाली आणि सेट जोडी फुटली. टॅमीने इंग्लंडसाठी सर्वाधिक 54 रन्स केल्या. टॅमीने या खेळीत 1 षटकार आणि 8 चौकार लगावले.
त्यानंतर अॅलिस कॅप्सी 5 धावांवर बाद झाली. एमीच्या रुपात इंग्लंडने सहावी विकेट गमावली. एमीने 27 बॉलमध्ये 4 फोरसह 32 रन्स केल्या. तर सामन्यातील शेवटच्या बॉलवर इंग्लंडने सातवी विकेट गमावली. सोफी एक्लेस्टोन रन आऊट झाली. सोफीने 23 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारसह 35 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून श्री चरणी हीने 2 विकेट्स मिळवल्या. तर दीप्ती शर्मा आणि अमनज्योत कौर या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
टीम इंडियाची बॅटिंग
दरम्यान त्याआधी भारताने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 181 रन्स केल्या. भारतासाठी जेमिमाह रॉड्रिग्स आणि अमनज्योत कौर या जोडीने सर्वाधिक धावा केल्या. तर रिचा घोष हीने अमनज्योतला चांगली साथ दिली. ओपनर स्मृती मंधाना 13 धावांवर बाद झाली. शफाली वर्मा हीने पुन्हा एकदा निराशा केली. शफाली 3 रन्सवर आऊट झाली. कॅप्टन हरमनप्रीत कौर 1 धावेवर बाद झाली.
जेमीमाहने 41 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 9 फोरसह 63 रन्स केल्या. जेमीमाह आऊट झाल्यानंतर अमनज्योत आणि रिचा या जोडीने नाबाद 57 धावांची नाबाद भागीदारी केली आणि टीम इंडियाला 181 धावांपर्यंत पोहचवलं. अमनज्योतने 40 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने नाबाद 63 धावा केल्या. तर रिचा घोष हीने 6 चौकारांसह 20 चेंडूत नाबाद 32 धावांचं योगदान दिलं.
महिला ब्रिगेड 2-0 ने आघाडीवर
Two wins out of two for #TeamIndia 🥳
A victory by 24 runs in Bristol as India take a 2⃣-0⃣ lead in the T20I series 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/j4IYcst6GO#ENGvIND pic.twitter.com/FsgcZNVInW
— BCCI Women (@BCCIWomen) July 1, 2025
दरम्यान उभयसंघातील तिसरा आणि निर्णायक सामना हा शुक्रवारी 4 जुलैला होणार आहे. भारताला तिसरा सामना जिंकण्यासह मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी तिसर्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळे तिसरा सामना रंगतदार होऊ शकतो.
