
दक्षिण अफ्रिकेने दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. दक्षिण अफ्रिकेने दोन दिवस फलंदाजी केली आणि सर्व गडी गमवून 489 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 201 धावा करून तंबूर परतला. यशस्वी जयस्वालने या सामन्यात सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. थेट आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या वॉशिंग्टन सुंदरने 92 चेंडूंचा सामना करत 48 धावा केल्या. खरं तर मागच्या कसोटी सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर प्रमोशन दिलं होतं. पण अचानक दुसऱ्या कसोटी सामन्यात थेट आठव्या क्रमांकावर उतरवलं. हा बदल पाहून क्रीडाप्रेमीही आवाक् झाले. मात्र असं का ते कळत नव्हतं. अखेर वॉशिंग्टन सुंदरने स्वत: यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर पत्रकार परिषदेला सामोरं गेला. यावेळी वॉशिंग्टन सुंदरने सांगितलं की, ‘मला असा क्रिकेटपटू व्हायचं आहे की जो वेगवेगळ्या भूमिकेत बसू शकेल. हा एक सांघिक खेळ आहे.’ त्याच्या बोलण्यातून स्पष्ट झालं की संघ त्याला कोणत्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवलं तरी त्याला त्याने काही फरक पडत नाही. पण त्याचा क्रम वारंवार बदलल्याने टीम इंडियाच्या कामगिरीवर मात्र परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे मधल्या फळीतील फलंदाजांनी नांगी टाकली असताना वॉशिंग्टन सुंदर आठव्या क्रमांकावर उतरून 48 धावा करतो हे काय कमी आहे का? दुसरीकडे त्याने एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला की, ‘आयुष्यात सकारात्मक राहा, काय होईल हे तुम्हाला कधीच कळत नाही.’
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने बिनबाद 26 धावा केल्या होत्या. दक्षिण अफ्रिकेच्या 314 धावा झाल्या आहेत. यात आणखी भर पडणार यात काही शंका नाही. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात दक्षिण अफ्रिकेचे आघाडीचे फलंदाज आक्रमक खेळतील यात काही शंका नाही. त्यांना जर नशिबाची साथ मिळाली तर नक्कीच 500 धावांचा टप्पा गाठतील. त्यामुळे टीम इंडियाला चौथ्या आणि पाचव्या दिवशी डिफेन्स करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. खरं तर डिफेन्स करतानाच विकेट गमावतील अशी भीती आहे. त्यामुळे हा चमत्कार घडला तर आणि तरच ड्रॉ होऊ शकतो. टीम इंडियाचा विजय तर खूपच कठीण आहे.