Champions Trophy : पाच फिरकीपटूंना दुबईत घेऊन जाण्याचं कारण काय? वरुणची संघात निवड होताच अश्विनने विचारला प्रश्न

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाकडून फार अपेक्षा आहेत. मागच्या पर्वात पाकिस्तानने भारताला पराभवाची धूळ चारली होती. आता भारताकडून परतफेडीची अपेक्षा आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त आणि यशस्वी जयस्वालला बसल्यानंतर नव्याने संघ जाहीर केला आहे. या संघावर आर अश्विनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Champions Trophy : पाच फिरकीपटूंना दुबईत घेऊन जाण्याचं कारण काय? वरुणची संघात निवड होताच अश्विनने विचारला प्रश्न
| Updated on: Feb 14, 2025 | 8:29 PM

टीम इंडियाने इंग्लंडला वनडे मालिकेत लोळवल्यानंतर आता चॅम्पियन ट्रॉफीसाठी सज्ज झाली आहे. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघात बरीच उलथापालथ झाली. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने स्पर्धेला मुकला. तर यशस्वी जयस्वालला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. निवड समितीने जसप्रीत बुमराहच्या जागी हार्षित राणा, तर यशस्वी जयस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीला संधी दिली आहे. वरुण चक्रवर्तीला संघात घेतल्याने आता भारतीय संघात पाच फिरकीपटू झाले आहे. पाच फिरकीपटूंची खरंच टीम इंडियाला गरज आहे का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करत आहेत. दुसरीकडे, या प्रकरणात आता माजी फिरकीपटू आर अश्विनने देखील उडी घेतली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड मॉडेलवर होणार आहे. भारताचे सर्व सामना दुबईत होणार आहेत. भारताने उपांत्य आणि अंतिम फेरीत प्रवेश केला तर हे सामनेही दुबईत होतील.

दुबईची खेळपट्टी ही फिरकीपटूंना मदत करणारी आहे. त्यामुळे निवड समितीने असा निर्णय घेतला असावा. पण फिरकीपटू आर अश्विनला यात तसं काही वाटत नाही. आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘मला नेमकं कळत नाही की आपण दुबईत किती फिरकीपटू घेऊन चाललो आहोत. पाच फिरकीपटू आणि आम्ही यशस्वी जयस्वालला बाहेर केलं. मला जिथपर्यंत कळतं तिथपर्यंत एका दौऱ्यासाठी आम्ही तीन ते चार फिरकीपटू घेऊन जातो. पण दुबईत पाच फिरकीपटू? मला कळत नाही. मला वाटतं आपल्याकडे दोन किंवा एक फिरकीपटू जास्त आहे.’

‘फिरकीपटूंना दुबईत नेण्यात काय अर्थ आहे? दोन डावखुरे फिरकीपटू सर्वश्रेष्ठ अष्टपैलू आहेत. अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा दोघंही खेळणार आहेत. हार्दिक आणि कुलदीप यादवही खेळणार आहे. जर वरुण चक्रवर्ती संघात हवा असेल तर एका वेगवान गोलंदाजाला बसवावं लागेल. तसेच हार्दिक पांड्याला दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून वापरावं लागेल. नाही तर तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला वापरून एका फिरकीपटूला बाहेर बसवावं लागेल.’, असं आर अश्विन प्लेइंग इलेव्हनबाबत म्हणाला.