
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चांगली सुरूवात केली आहे. दोन्ही संघांनी सुरूवातीचे सामने जिंकले आहेत. त्यामुळे तिसरा सामना सुपर 8 फेरीचं दार उघडणार आहे. दोन्ही संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नवव्यांदा भिडणार आहेत. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ आठवेळा भिडले आहेत. यात भारताने सात वेळा, तर पाकिस्तानने भारताला एकदा मात दिली आहे. 2021 मध्ये दुबई येथे झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 10 राखून पराभव केला होता. चला जाणून घेऊयात आतापर्यंतचा रेकॉर्ड काय ते…
2007 मध्ये भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमनेसामने आले होते. साखळी फेरीत भारताने बॉल आउटमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं होतं. तर अंतिम फेरीत महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानला पराभूत करत पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.
2012 च्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान तिसऱ्यांदा आमनेसामने आले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 128 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 17 षटकांत फक्त 2 गडी गमावून सहज विजय मिळवला होता. हा स्पर्धेतील भारताचा तिसरा विजय होता.
टी20 वर्ल्डकप 2014 स्पर्धेत पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 130 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 18.3 षटकांत 3 गडी गमावून विजय मिळवला. 2016 साली झालेल्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ ईडन गार्डन्सवर भिडले होते. तेव्हा 18 षटकात पाकिस्तानने 118 धावा केल्या. हे लक्ष्य भारताने 4 गडी गमवून 15.5 षटकात पूर्ण केलं.
टी20 वर्ल्डकप 2021 स्पर्धेत भारताला पहिल्यांदा पाकिस्तानकडून धोबीपछाड मिळाला. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानने 10 गडी राखून जिंकलं. त्यानंतर भारताने 2022 स्पर्धेत या पराभवाचा वचपा काढला. पाकिस्तानने 159 धावांचं लक्ष्य दिलं होतं. भारताने शेवटच्या चेडूंवर रोमहर्षक विजय मिळवला. 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पुन्हा आमनेसामने आले होते. तेव्हा भारताचा डाव फक्त 119 धावांवर आटोपला. हा सामना भारत गमवेल अशीच स्थिती होती. पण पाकिस्तानला सर्व गडी गमवून 113 धावा करता आल्या. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकला.