IPL 2026 : प्लेऑफच्या सामन्यात पाऊस पडला तर कसं असेल गणित, बीसीसीआयचा नियम समजून घ्या
IPL 2026 Playoff Rules: आयपीएल 2026 स्पर्धेचे साखळी फेरीतील सामने आता अंतिम टप्प्यात आहेत. 26 मे पासून प्लेऑफ स्पर्धा सुरू होईल. जर प्लेऑफच्या सामन्यात पाऊस पडला तर कसा निकाल दिला जाईल? जाणून घेऊयात

आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने 24 मे रोजी संपतील. त्यानंतर प्लेऑफच्या सामन्यांचा थरार रंगेल. 26 मेपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरूवात होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना 31 मे रोजी होणार आहे. प्लेऑफचे सामने तीन वेगवेगळ्या मैदनात खेळले जाणार आहे. पहिला क्वॉलिफायर सामना धर्मशाळेत, एलिमिनेटर आणि दुसरा क्वॉलिफायर सामना न्यू चंदीगड येथे होणार आहे. तर अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. पण या सामन्यात पाऊस पडला तर निकाल कसा दिला जाईल? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. साखळी फेरीत सामना रद्द झाला तर प्रत्येकी एक गुण वाटून विषय संपवला जातो. प्लेऑफमध्ये तसं करता येणार नाही. कारण एखाद्या संघांचं जेतेपदाचं स्वप्न भंगू शकते.
प्लेऑफमध्ये पाऊस पडला तर असा नियम
आयसीसी स्पर्धांमध्ये बाद फेरीच्या सामन्यांसाठी एक दिवस राखीव ठेवला जातो. पण आयपीएल प्लेऑफसाठी नियम थोडे वेगळे आहे. पहिल्या क्वॉलिफायर, एलिमिनेटर आणि दुसऱ्या क्वॉलिफायरसाठी राखीव दिवसाचा कोणताीह नियम नाही. फक्त अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे क्वॉलिफायर आणि एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला तर विजेता कसा घोषित करणार? हा प्रश्न आहे. त्यासाठी बीसीसीआयचा नियम आहे.
क्वॉलिफायर आणि एलिमिनेटर सामन्यात पाऊस पडला तर त्याच दिवशी सामना कसाही करून संपवण्याचा प्रयत्न असेला. सामना सुरू होण्यास विलंब झाल्यास किमान पाच षटकांचा सामना खेळला जाईल. यासाठी 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला गेला आहे. यात हा सामना संपवणं भाग आहे. पण 120 मिनिटांच्या अतिरिक्त वेळेतही सामना संपला नाही तर काय? कारण तीन प्लेऑफ सामन्यात राखीव दिवस नाही. त्यासाठी गुणतालिकेतील स्थान महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावरून त्या सामन्याचा निकाल दिला जाईल.
उदाहरण द्यायचं झालं तर अ आणि ब संघ क्वॉलिफायर सामना खेळत आहेत. अ संघ गुणतालिकेत पहिल्या आणि ब संघ दुसऱ्या स्थानावर आहे. हा सामना पावसामुळे झालाच नाही तर अ संघाला पुढचं तिकीट दिलं जाईल. हाच एलिमिनेटर आणि क्वॉलिफायर 2 साठी लागू असेल.