IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्स संघ पुढे काय करणार? अजिंक्य रहाणेने सगळं काही सांगून टाकलं

आयपीएल 2026 स्पर्धा कोलकाता नाईट रायडर्ससाठी वाईट स्वप्न आहे. कारण आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने एक गुण मिळाला आहे. अशा स्थितीत प्लेऑफमध्ये पोहोचणं कठीण असल्याचं दिसत आहे.

IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्स संघ पुढे काय करणार? अजिंक्य रहाणेने सगळं काही सांगून टाकलं
IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्स संघ पुढे काय करणार? अजिंक्य रहाणेने सगळं काही सांगून टाकलं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 18, 2026 | 4:35 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात कोलकाता नाईट रायडर्सची निराशाजनक कामगिरी सुरु आहे. कोणताही पत्ता टाकला तर तो उलटाच पडतो अशी स्थिती कोलकाता नाईट रायडर्सची झाली आहे. आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्सने सहा सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात पाऊस पडल्याने प्रत्येकी एक गुण मिळाला. त्यामुळे गुणतालिकेत केकेआरचा संघ तळाशी आहे. आता पाच सामन्यात पराभव झाल्याने आता पुढच्या प्रत्येक सामन्यात करो या मरोची स्थिती असणार आहे. कारण या स्पर्धेत 16 गुण मिळवणारा संघ प्लेऑफमध्ये निश्चित खेळतो. त्यामुळे जर तरच्या लढाईतून बाहेर पडायचं असेल तर उर्वरित आठ सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक सामना हा करो या मरोची लढाई आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पाचव्या पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने आपलं मत व्यक्त केलं.

कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘मला वाटतं, सगळं काही वर्तमानात जगण्याबद्दल आहे. जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत, तेव्हा तुम्ही खूप गोष्टींचा विचार करू लागता. मला वाटतं, सगळं काही वर्तमानात जगण्याबद्दल आहे. फक्त मैदानावर जाऊन खेळाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, त्यांचा विचार करण्याऐवजी एक संघ म्हणून स्वतःवर विश्वास ठेवायचा. मला वाटतं, एक संघ म्हणून आम्हाला फक्त मैदानावर जाऊन आमचा खेळ खेळायचा आहे आणि आज आम्हाला तेच करायचं होतं. फक्त आक्रमक राहायचं, पहिल्या चेंडूपासून सकारात्मक राहायचं.’

कोलकाता नाईट रायडर्सचा पुढचा सामना हा राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता होणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा वरचष्मा असणार यात काही शंका नाही. पण कोलकात्याला आता पुढचे प्रत्येक सामना युद्धासारखा लढावा लागणार आहे. आता केकेआरचा संघ काय चमत्कार करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. खरं तर अशा स्थितीत कमबॅक करणं कठीण असतं. पण कर्णधार अजिंक्य रहाणेच्या सकारात्मक विचारसरणीचा काही फरक पडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Follow Us