स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास काय करतात? कुटुंबात आणखी कोण कोण?

Smriti Mandhana Family : क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती जाणून घेऊयात.

स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास काय करतात? कुटुंबात आणखी कोण कोण?
Smriti Mandhana Family
| Updated on: Nov 23, 2025 | 9:05 PM

भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधनाचे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वडिलांची प्रकृती सुधारत नाही तोपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृतीने घेतला आहे. स्मृतीच्या कारकि‍र्दीत श्रीनिवास यांचा सिंहाचा वाटा आहे. लहानपणापासून त्यांनी स्मृतीला योग्य मार्गदर्शन केलेले आहे. श्रीनिवास मानधना कोण आहेत आणि स्मृतीच्या कुटुंबात आणखी कोण कोण आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

श्रीनिवास मानधना क्रिकेटपटू होते

स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना हे एक क्रिकेटपटू होते. त्यांना सांगलीसाठी क्रिकेट खेळलेले आहे. मात्र कुटुंबाकडून पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांना क्रिकेट सोडावे लागले. नंतर त्यांनी केमिकल डिस्ट्रिब्युटर म्हणून काम केले. त्यांना श्रवण आणि स्मृती अशी दोन मुले आहेत. श्रीनिवास यांनी आपल्या मुलांद्वारे क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी श्रवणला चांगले प्रशिक्षण दिले, श्रवणने महाराष्ट्र अंडर-16 स्पर्धेत खेळलेला आहे. श्रवणला क्रिकेट खेळताना पाहून स्मृती मानधनाही क्रिकेटकडे वळली. स्मृती फक्त 9 वर्षांची होती तेव्हापासून क्रिकेटचे धडे घेत आहे. श्रीनिवास मानधना हे तिला सरावासाठी घेऊन जायचे, नेटमध्ये गोलंदाजीही करायचे. तिच्या आहाराची आणि व्यायामाची काळजी घ्यायचे त्यामुळे स्मृती एक जागतिक दर्जाची क्रिकेटर बनू शकली.

अभ्यासापेक्षा क्रिकेटवर जास्त लक्ष

श्रीनिवास हे स्मृतीच्या अभ्यासावर आणि क्रिकेट सरावावर बारीक लक्ष ठेवून होते. 15 वर्षांची असताना स्मृतीला सायन्स शाखा निवडाची होती मात्र कारण अभ्यास आणि क्रिकेटचा समतोल साधण्यासाठी तिला सायन्सला प्रवेश घेऊ दिला नाही. त्यावेळी श्रीनिवास आणि त्यांच्या कुटुंबाने क्रिकेटला प्राधान्य दिले. यानंतर एकाच वर्षात स्मृतीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 5 एप्रिल 2013 रोजी स्मृती भारतासाठी पहिला सामना खेळली आणि तिने आजपर्यंत मागे वळून पाहिले नाही. आता स्मृतीचे वडील सांगलीमध्ये SM18 कॅफे चालवतात. याद्वारे ते तरुण खेळाडूंना प्रेरणा देतात.

स्मृतीच्या कुटुंबात कोण कोण आहे?

स्मृतीच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि एक मोठा भाऊ आहे. आईचे नाव स्मिता आहे. स्मिता या गृहिणी आहेत. तिचा भाऊ श्रवणने महाराष्ट्र अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. तो आता बँकर आहे. श्रवण सांगलीमध्ये SM18 कॅफे आणि टर्फ क्लब देखील चालवतो.