टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी राखीव खेळाडू का नाही? बीसीसीआय सचिवांनी सांगितलं कारण

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून बीसीसीआयने जेतेपद कायम राखण्यासाठी संघाची घोषणा केली आहे. पण यावेळेस संघाची घोषणा करताना राखीव खेळाडू मात्र जाहीर केलेले नाहीत. या मागचं कारण बीसीसीआय सचिवांनी स्पष्ट केलं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी राखीव खेळाडू का नाही? बीसीसीआय सचिवांनी सांगितलं कारण
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी राखीव खेळाडू का नाही? बीसीसीआय सचिवांनी सांगितलं कारण
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Dec 20, 2025 | 9:36 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला दीड महिन्यांचा अवधी शिल्लक असताना टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात 15 सदस्य संघाची घोषणा करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिका आणि टी20 वर्ल्डकपसाठी हा संघ निवडला गेला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी पत्रकार परिषदेत संघातील खेळाडूंची नावं वाचून दाखवली. पण यावेळी संघ घोषित करताना राखीव खेळाडूंची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुले अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत तीन राखीव खेळाडू ठेवले होते. मात्र यावेळी फक्त 15 जणांचा स्क्वॉड घोषित करण्यात आला आहे. एखादा खेळाडू जखमी किंवा काही प्रॉब्लेम आल्यास बॅकअप असावा. ऐनवेळी खेळाडूची शोधाशोध नको म्हणून त्यांची निवड केली जाते. पण यावेळी तसं करणं टाळलं. पण या मागचं कारण देवजीत सैकिया यांनी नंतर स्पष्ट केलं.

पत्रकार परिषदेत बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत स्टँडबाय खेळाडू का नाही? कारण ही स्पर्धा भारतातच खेळली जात आहे. त्यामुळे या राखीव खेळाडूंची घोषणा केली नाही. भारतात स्पर्धा असल्याने ऐनवेळी कोणत्याही खेळाडूला संघात सहभागी केलं जाऊ शकतं. विदेशात स्पर्धा असती तर खेळाडूंना येथून पाठण्यात वेळ लागतो. त्यामुळे रिझर्व्ह खेळाडू निवडले जातात. म्हणून यावेळी रिझर्व्ह खेळाडूंची घोषणा केलेली नाही.

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये झाली होती. तेव्हा शुबमन गिलसह, रिंकु सिंह, खलील अहमद आणि आवेश खान स्टँडबाय खेळाडू म्हणून होते. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीत यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शिवम दुबे यांना स्टँडबाय म्हणून निवडलं होतं.

दरम्यान, सध्या निवडलेल्या संघातून प्लेइंग 11 चं चित्रही स्पष्ट होताना दिसत आहे. इशान किशन आणि रिंकु सिंह यांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण दिसत आहे. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंह, हार्षित राणा, कुलदीप यादव आणि वरूण चक्रवर्ती यापैकी गरजेनुसार पर्याय निवडले जातील.