IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही? कर्णधार श्रेयस अय्यरच्या उत्तराने संभ्रम वाढला

आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाची नाचक्की झाली. जागतिक क्रमवारीत एक नंबर असलेल्या संघावर पराभवाची नामुष्की ओढावली. असं असताना या दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये जागा न दिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. आता इंग्लंड दौऱ्यात पुन्हा एकदा सस्पेन्स वाढला आहे.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही? कर्णधार श्रेयस अय्यरच्या उत्तराने संभ्रम वाढला
IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार की नाही? कर्णधार श्रेयस अय्यरच्या उत्तराने संभ्रम वाढला
Image Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jun 30, 2026 | 10:41 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं जेतेपद पटकावल्यानंतर बीसीसीआयने सूर्यकुमारकडून नेतृत्व काढून श्रेयस अय्यरकडे सोपवलं आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात बीसीसीआयला फार अपेक्षा आहेत. मात्र पहिल्याच मालिकेत दुबळ्या आयर्लंडने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. असं असताना भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे श्रेयस अय्यरवर दबाव असणार आहे. त्यात आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत वैभव सूर्यवंशीला संधी दिली नव्हती. त्यामुळे श्रेयस अय्यर टीकेचा धनी ठरला होता. आता इंग्लंड विरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत वैभवला पदार्पणाची संधी मिळणार का? असा प्रश्न आहे. असं असताना या प्रश्नावर कर्णधार श्रेयस अय्यरने दिलेलं उत्तर ऐकून संभ्रम वाढला आहे. श्रेयस अय्यरने सांगितलं की, टीममधील प्रत्येक खेळाडूने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे हात बांधले गेले आहेत.

श्रेयस अय्यर काय म्हणाला?

श्रीलंका अ विरूद्धच्या सामन्यात भारत अ कडून खेळताना वैभव सूर्यवंशीने आक्रमक फटकेबाजी केली होती. त्यात आयपीएल स्पर्धेतही त्याच्या आक्रमक बाणा पाहण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आयर्लंड नाही तर इंग्लंड दौऱ्यात त्याला संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. पण श्रेयस अय्यरच्या उत्तराने वैभवचं पदार्पण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. वैभवला खेळवण्याच्या आव्हानाबद्दल विचारले असता श्रेयस अय्यर म्हणाला की, “संघात खेळणाऱ्या प्रत्येकाने चांगली कामगिरी केली आहे; हा केवळ एका व्यक्तीचा प्रश्न नाही. प्रत्येकाला संधी आणि सुरक्षितता देणे हे आमचे ध्येय आहे, जेणेकरून प्रत्येकाला आत्मविश्वास वाटेल. ज्यांनी आम्हाला मागचा विश्वचषक जिंकण्यास मदत केली, त्यांना कसे खेळायचे हे माहित आहे आणि ते तसे खेळत आहेत.”

श्रेयस अय्यर पुढे म्हणाला की, ‘”काय होऊ शकते हे आम्हाला माहीत नाही. आम्ही सध्या काय करू शकतो यावर आमचे नियंत्रण नाही, कारण ही एक अत्यंत गोपनीय बाब आहे. आम्ही फक्त संघातच यावर चर्चा करतो. आम्ही कोणत्या संघ संयोजनासह मैदानात उतरू आणि प्रतिस्पर्ध्यांना काय होणार आहे हे आम्ही सांगू शकत नाही.”

Follow Us