IND vs PAK : सूर्यकुमार यादवनंतर आता हरमनप्रीत कौरची पाळी, पाकिस्तानला 12-0 ने मात देण्यास सज्ज

Women's ODI World Cup: भारतीय पुरूष संघाने मागच्या तीन रविवारी पाकिस्तानला 3-0 ने मात दिली. भारताने पाकिस्तानी संघाला अपेक्षेप्रमाणे लायकी दाखवली. आता भारतीय महिला संघाकडून तशाच कामगिरीची अपेक्षा आहे. दोन्ही संघ रविवारी आमनेसामने येणार आहेत.

IND vs PAK : सूर्यकुमार यादवनंतर आता हरमनप्रीत कौरची पाळी, पाकिस्तानला 12-0 ने मात देण्यास सज्ज
IND vs PAK : सूर्यकुमार यादवनंतर आता हरमनप्रीत कौरची पाळी, पाकिस्तानला 12-0 ने मात देण्यास सज्ज
Image Credit source: Getty Images
| Updated on: Oct 01, 2025 | 4:24 PM

India Women vs Pakistan Women: सलग चौथ्या रविवारी क्रीडाप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्याची अनुभूती मिळणार आहे. आशिया कप 2025 स्पर्धेत तीन वेळा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान लढत पाहता आली. आता पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना होणार आहे. आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना श्रीलंकेत होणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ पाकिस्तानला धोबीपछाड देण्यासाठी सज्ज असणार आहे. भारताने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेला मात दिली होती. आता दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा मानस आहे.

कोलंबो येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय महिला संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. हा सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे. भारतीय महिला संघ यावेळी 12-0 ने मात देण्यास सज्ज आहे. हो, तुम्ही वाचलं ते अगदी खरं आहे. भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान मागच्या 20 वर्षात 11 वेळा आमनेसामने आले आहेत. प्रत्येक वेळी भारतीय महिला संघाने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. आता धोबीपछाड देण्याची 12वी वेळ असणार आहे. भारतीय संघाची कामगिरी आणि सध्याचा फॉर्म पाहता पाकिस्तानला येत्या रविवारीही पराभूत व्हावं लागेल. त्यामुळे क्रीडाप्रेमी 12-0 ची अपेक्षा करत आहेत. भारताची  सध्याची स्थिती पाहता पाकिस्तानला धोबीपछाड देईल, असं क्रीडाप्रेमीना वाटत आहे.

वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत जागा मिळवण्यासाठी भारतीय संघाला प्रत्येक विजय महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या सामन्यातच विजय मिळवला तर पुढचा प्रवास सोपा होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी असून रॉबिन राउंड पद्धतीने प्रत्येकासोबत एक सामना होणार आहे. श्रीलंकेला पराभूत करत भारताचा 2 गुणांसह +1.225 रनरेट आहे. आता पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवून 4 गुणांसह नेट रनरेट वाढवण्यावर भर असणार आहे.

सूर्यकुमारच्या नेतृत्त्वात भारतीय महिला संघाने मागच्या तीन रविवारी पाकिस्तानचा पराभव केला. साखळी फेरीत 14 सप्टेंबरला, सुपर 4 फेरीत 21 सप्टेंबर आणि आता 28 सप्टेंबरला अंतिम फेरीत मात दिली होती. आता महिला संघ 5 ऑक्टोबरला रविवारी पाकिस्तानशी भिडणार आहे.