
वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धा प्रत्येक सामन्यानंतर आता रंगतदार वळणावर जात आहे. या स्पर्धेतील 12वा सामना इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात पार पडला. नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी स्वीकारली. निर्णय त्यांच्या बाजूने लागला पण या सामन्यावर पूर्णपणे इंग्लंडने वर्चस्व गाजवलं. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमवून 253 धावा केल्या आणि विजयासाठी 254 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना श्रीलंकेची दाणादाण उडाली. धडाधड विकेट पडत गेल्या. त्यामुळे चेंडू आणि धावांचं अंतर वाढत गेलं. त्यामुळे फलंदाजांवर दडपण वाढलं. प्रत्येक षटकानंतर श्रीलंकेच्या हातून सामना निसटत होता. श्रीलंकेला पहिला धक्का 37 धावांवर बसला आणि दुसरी विकेट 95 धावांवर पडली. त्यामुळे इथपर्यंत श्रीलंकेची स्थिती चांगली होती. मात्र त्यानंतर डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. श्रीलंकेला फक्त 164 धावांपर्यंत मजल मारता आणि हा सामना 89 धावांनी गमावला.
तिसरी विकेट 98 धावांवर, चौथी विकेट 103 धावांवर, पाचवी विकेट 116 धावांवर, सहावी विकेट 134 धावांवर, सातवी विकेट 145 धावांवर, आठवी विकेट 157 धावांवर, नववी विकेट 157 धावांवर, तर दहावी विकेट 164 धावांवर पडली आहे. त्यामुळे सामना पूर्णपणे श्रीलंकेच्या हातून गेला. इंग्लंडने या सामन्यात श्रीलंकेला डोकंच वर काढू दिलं नाही. खासकरून सोफी एक्सलस्टोनने 10 षचकात 3 षटकं निर्धाव टाकली. तसेच 17 धावा देत 4 विकेट काढल्या. नॅट स्कायव्हर ब्रंट आणि चार्लेट डीनने प्रत्येकी 2 विकेट, तर लिन्सी स्मिथ आणि एलिस कॅप्से यांनी प्रत्येकी 1 विकेट काढली.
इंग्लंडने या स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला फटका बसला आहे. इंग्लंडने 6 गुणांसह पहिलं स्थान गाठलं आहे. ऑस्ट्रेलिया 5 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर भारत आणि दक्षिण अफ्रिका याचे प्रत्येकी 4 गुण आहेत. पण नेट रनरेटच्या गणितात भारतात पुढे असल्याने तिसऱ्या स्थानी आहे. गुणतालिकेतील हे गणित पाहता भारत ऑस्ट्रेलिया सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर पहिलं स्थान गाठेल. तर भारताने हा सामना जिंकला तर दुसऱ्या स्थानी विराजमान होईल. इंग्लंडपेक्षा नेट रनरेट चांगल्या झाल्यास पहिल्या स्थान गाठू शकते. पण नेट रनरेटमध्ये बराच फरक असल्याने तसं होणं कठीण आहे.