दिल्ली कॅपिटल्स पडली मुंबई इंडियन्सवर भारी, शेवटच्या चेंडूवर मिळवला थरारक विजय
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 2 विकेट राखून लोळवलं. या सामन्यात कधी सामना इथे तर कधी तिथे अशी स्थिती होती. मात्र अखेर दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात विजय मिळवला.

दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सवर थरारक विजय मिळवला. या सामन्यात कोण बाजी मारणार याची उत्सुकता शेवटच्या चेंडूपर्यंत ताणली गेली होती. एका चेंडूत दोन धावांची गरज होती. पण शेवटच्या चेंडूवर अरुंधतीने दोन धावा घेतल्या आणि सामना आपल्या बाजूला ओढला. खरं तर अगदी किंचितच्या फरकाने हा सामना जिंकला असं म्हणावं लागेल. कारण दुसरी धाव घेताना धावचीतची अपील करण्यात आली होती. थोड्याशा फरकाने बॅट मधे आली आणि तिसऱ्या पंचांनी नाबाद दिलं. हा निर्णय नाबाद दिला आणि दिल्लीने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच मुंबई इंडियन्सला 19.1 षटकात 164 धावांवर रोखलं. मुंबई इंडियन्सने दिलेलं 165 धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर गाठलं.
शेवटच्या षटकात 10 धावांची आवश्यकता होती. एस संजनाला शेवटचं षटक सोपवलं होतं. पहिल्याच चेंडूवर निक्की प्रसादने चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवर दोन धावा आल्या. त्यामुळे 4 चेंडूत 4 धावा अशी स्थिती आली. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर 1 धाव घेतली. त्यामुळे 2 चेंडूत दोन धावा अशा वळणावर सामना आला. पाचव्या चेंडूवर निक्की प्रसादने उत्तुंग फटका मारण्याच्या नादात विकेट देऊन बसली. त्यामुळे 1 चेंडू आणि 2 धावा अशा स्थितीत अरुंधती रेड्डी स्ट्राईकला आली. तिने जोरदार फटका मारला आणि दोन धावा घेत संघाला विजय मिळवून दिला. मागच्या पर्वात सजीवन संजना शेवटच्या चेंडूवर षटकार मारून मुंबई इंडियन्सला जिंकवून दिलं होतं. पण या पर्वात गोलंदाजीत ती कमाल करता आली नाही. अरुंधतीने शेवटच्या चेंडूवर 2 धावा घेऊन मागच्या पर्वातील हिशेब चुकता केला असंच म्हणावं लागेल.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णदार), अमेलिया केर, सजीवन सजाना, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, मेग लेनिंग (कर्णधार), ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, ॲनाबेल सदरलँड, निकी प्रसाद, सारा ब्राइस (विकेटकीपर), शिखा पांडे, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, राधा यादव.