
मुंबई इंडियन्स टीमने कॅप्टन हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील सहाव्या सामन्यात मंगळवारी 13 जानेवारीला गुजरात जायंट्सला पराभूत केलं. मुंबईने विजयासाठी मिळालेलं 193 धावांचं आव्हान हे 19.2 षटकांत 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने या विजयासह चौथ्या हंगामातील आपला एकूण आणि सलग दुसरा विजय मिळवला. मुंबईने यासह सलग 2 सामने जिंकणाऱ्या गुजरातच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लावला. मुंबईला विजयापर्यंत पोहचवण्यात सर्व 11 खेळाडूंनी योगदान दिलं. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौर हीने मुंबईला विजयी करण्यात बॅटिंगने सर्वाधिक योगदान दिलं. हरमनप्रीत कौर हीने अखेरपर्यंत नाबाद राहत मुंबईला विजयी केलं. हरमनप्रीतने 43 बॉलमध्ये 71 धावा केल्या. हरमनप्रीतने या खेळीसह इतिहास घडवला. हरमनप्रीतने या खेळीच्या जोरावर मोठा विक्रम मोडीत काढला.
हरमनप्रीतने 17 व्या ओव्हरमध्ये एकूण 33 बॉलच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. हरमनप्रीतच्या डब्ल्यूपीएल कारकीर्दीतील हे 10 वं अर्धशतक ठरलं. हरमनप्रीतने यासह इतिहास घडवला. हरमनप्रीत डब्ल्यूपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकं लगावणारी पहिली फलंदाज ठरली. हरमनप्रीतने मेग लेनिंग हीचा रेकॉर्ड उद्धवस्त केला. विशेष म्हणजे हरमनप्रीतचं हे या मोसमातील एकूण आणि सलग दुसरं अर्धशतक ठरलं. हरमनप्रीतने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं. हरमनप्रीतने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 42 बॉलमध्ये नॉट आऊट 72 रन्स केल्या होत्या.
हरमनप्रीतने या 71 धावांच्या खेळीसह मेग लेगिंग हीला आणखी एक झटका दिला. हरमनप्रीत मेगला पछाडत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी एकूण दुसरी तर पहिली भारतीय फलंदाज ठरली. हरमनप्रीतने या स्पर्धेत 1 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. हरमनप्रीत 1 हजार धावा करणारी नॅट सायव्हर ब्रँट हीच्यानंतर पहिलीच महिला फलंदाज ठरली.
हरमनप्रीतला गुजरात जायंट्स विरुद्धच्या विजयी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. हरमनप्रीतची वूमन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवण्याची ही चौथ्या मोसमातील सलग आणि एकूण दुसरी वेळ ठरली. हरमनप्रीतला याआधी दिल्ली विरूद्धच्या विजयानंतरही वूमन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
दरम्यान मुंबईला गुजरात विरूद्धच्या विजयानंतर मोठा फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये एकूण 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आरसीबीच्या खात्यातही 4 गुण आहेत. मात्र आरसीबीचा नेट रनरेट हा मुंबईच्या तुलनेत चांगला आहे. त्यामुळे आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे.