Harmanpreet Kaur : कर्णधार हरमनप्रीत कौर पहिल्या पराभवानंतर पेटली, 11 चेंडूत 50 धावा, दिल्ली विरुद्ध फायर खेळी
MIW vs DCW WPL 2026 : मुंबई इंडियन्स वूमन्स टीमची कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने दिल्ली कॅपिट्ल्सला तडाखा दाखवला आहे. हरमनप्रीतने चौथ्या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यात चाबूक खेळी साकारली.

भारताने वनडे वुमन्स वर्ल्ड कपनंतर श्रीलंकेविरुद्ध विजयी घोडदौड कायम राखली. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात श्रीलंकेचा टी 20I मालिकेत 5-0 ने धुव्वा उडवला. मात्र गतविजेता संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही मुंबई इंडियन्स टीमला वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात विजयी सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली. मुंबईला शुक्रवारी 9 जानेवारीला मोसमातील पहिल्याच सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभूत व्हावं लागलं. रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने 155 धावांचा पाठलाग करताना शेवटच्या बॉलवर विजय साकारला. मात्र पहिल्या पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर ही पेटून उठली आहे. हरमनप्रीतने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार प्रहार केला आहे. हरमनप्रीतने वादळी अर्धशतकी खेळी साकारली आहे.
हरमनप्रीतने नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोलंदाजांची धुलाई केली. दिल्लीची कर्णधार जेमिमाह रॉड्रिग्स हीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हरमनप्रीतने या संधीचा पूर्ण फायदा घेत चौफेर फटकेबाजी केली. तसेच नॅट सायव्हर ब्रँट हीने दिल्लीच्या गोलंदाजांना बॅटने चोप दिला. त्यामुळे मुंबईला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 195 धावांपर्यंत मजल मारता आली.
मुंबईची बॅटिंग
मुंबईने 2 धावांवर पहिली विकेट गमावली. अमेलिया केर आली तशीच पहिल्या बॉलवर आऊट होऊन मैदानाबाहेर गेली. त्यानंतर जी कामालिनी आणि नॅट सायव्हर ब्रँट या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 49 धावांची भागीदारी केली. कामालिनीच्या रुपात मुंबईने 51 धावांवर दुसरी विकेट गमावली. कामालिनीने 16 धावा केल्या.
त्यानंतर हरमनप्रीत चौथ्या स्थानी बॅटिंगसाठी आली. हरमन आणि नॅट या जोडीने दिल्लीला झोडायला सुरुवात केली. दोघींनी दोन्ही बाजूने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. नॅट आणि हरमनप्रीतने तिसऱ्या विकेटसाठी 47 बॉलमध्ये 66 रन्सची पार्टनरशीप केली. नॅटने 46 बॉलमध्ये 13 फोरसह 70 रन्स केल्या.
नॅटनंतर हरमनप्रीतने तडाखा कायम ठेवला. हरमनप्रीतने निकोला केरी हीच्यासह भारताचा धावफळक धावता ठेवला. हरमनप्रतीने 18 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकला. यासह अवघ्या 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. हरमनप्रीतच्या अर्धशतकानंतर 19 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर निकोला आऊट झाली. निकोला आणि हरमनप्रीतने 25 बॉलमध्ये चौथ्या विकेटसाठी 53 रन्स जोडल्या.
हरमनप्रीतचा फिनिशींग टच
हरमनप्रीतने त्यानंतर सजीवन सजनासह फिनिशिंग टच दिला. हरमनप्रीतने सजीवनसह शेवटच्या 9 चेंडूत 25 धावांची नाबाद भागीदारी केली. सजीवनने नाबाद 5 धावा केल्या. तर हरमनप्रीतने मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. हरमनप्रीतने 176.19 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 74 रन्स केल्या. हरमनप्रीतने त्यापैकी 50 धावा या 11 चेंडूत चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. हरमनप्रीतने 8 चौकार (32 धावा) आणि 3 षटकारांच्या (18 धावा) मदतीने 50 धावा मिळवल्या. तर उर्वरित धावा या धावून घेतल्या.
