WPL स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारे 5 फलंदाज, शफाली वर्मा कितव्या स्थानी?
Most Runs In Womens Premier League History : डब्लूपीएल म्हणजेच वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या इतिहातील 3 हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कुणाच्या नावावर आहे? जाणून घ्या सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 फलंदाजांबाबत.

डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या हंगामाची (WPL 2026) शुक्रवार 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 3 हंगााम खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी 2 वेळा मुंबईने तर एकदा आरसीबीने डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील चौथ्या मोसमातील पहिल्या सामन्यात डब्ल्यूपीएल ट्रॉफी विजेता संघ भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. हा सामना 9 जानेवारीला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. या चौथ्या मोसमानिमित्ताने आपण या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावा करणाऱ्या 5 महिला फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.
सर्वाधिक WPL धावा
डब्ल्यूपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा मुंबई टीममधील नॅट सायव्हर ब्रँट हीच्या नावावर आहे. नॅटने या स्पर्धेतील 29 सामन्यांमधील 29 डावांत 46.68 च्या सरासरीने 1 हजार 27 धावा केल्या आहेत. नॅटने या दरम्यान 8 अर्धशतक झळकावली आहेत. नॅटची या स्पर्धेतील नाबाद 80 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. नॅट या स्पर्धेत 1 हजार किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारी एकमेव फलंदाज आहे.
एलिसा पेरी
डब्ल्यूपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आरसीबीची एलिसा पेरी दुसऱ्या स्थानी आहे. एलिसा पेरी हीने 25 सामन्यांमधील 25 डावांत 64.82 च्या सरासरीने 972 धावा केल्या आहेत. पेरीने या दरम्यान 8 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच पेरीने या स्पर्धेत एका डावात सर्वाधिक आणि नाबाद 90 धावा केल्या आहेत. पेरीने आरसीबीला 2024 मध्ये चॅम्पियन करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. मात्र पेरीने चौथ्या मोसमातून माघार घेतली आहे.
मेग लॅनिंग
दिल्लीची माजी कर्णधार मेग लॅनिंग ही तिसऱ्या स्थानी आहे. मेग लॅनिंग हीने 27 डावांमध्ये 9 अर्धशतकांसह 952 धावा केल्या आहेत.
लेडी सेहवाग चौथ्या स्थानी
भारताची लेडी सेहवाग अर्थात शफाली वर्मा ही या यादीत चौथ्या स्थानी आहे. शफालीने या स्पर्धेतील 27 सामन्यांमध्ये 865 धावा केल्या आहेत. शफालीने या स्पर्धेत 6 अर्धशतकं लगावली आहेत.
हरमनप्रीत कौर पाचव्या स्थानी
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी पाचवी फलंदाज आहे. हरमनप्रीतने या स्पर्धेतील 27 सामन्यांमधील 26 डावांत 40.52 च्या सरासरीने 851 धावा केल्या आहेत. हरमनप्रीतने या दरम्यान 8 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच हरमनप्रीत हीच्याच नेतृत्वात मुंबई 2 वेळा डब्ल्यूपीएल चॅम्पियन ठरली आहे.
