
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील सहाव्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा धुव्वा उडवला आहे. गुजरातने मुंबईसमोर 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे विजयी आव्हान 4 बॉलआधी 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. मुंबईने 19.2 ओव्हरमध्ये 193 धावा करत हा सामना 7 विकेट्सने आपल्या नावावर केला. मुंबईने अशाप्रकारे आपल्या तिसऱ्या सामन्यात सलग दुसरा विजय मिळवला आणि गुजरातला सलग तिसरा सामना जिंकण्यापासून रोखलं. तसेच मुंबईने या विजयासह या स्पर्धेच्या इतिहासात गुजरात जायंट्स विरुद्ध आपला दबदबा कायम राखलाय. मुंबईचा गुजरात विरुद्धचा या स्पर्धेतील हा सलग आठवा विजय ठरला. तर गुजरात जायंट्स पुन्हा एकदा पलटण विरुद्ध विजय मिळवण्यात अपयशी ठरली.
मुंबईच्या सलामी जोडीला विजयी धावसंख्या पाहता अपेक्षित सुरुवात मिळवून देण्यात अपयश आलं. जी कामालिनी आणि हेली मॅथ्यूज या दोघींना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र दोघीही त्या सुरुवातीचा फायदा घेण्यात अपयशी ठरल्या. कामालिनी हीने 13 तर हेलीने 22 धावा करुन मैदानाबेहरचा रस्ता धरला. त्यामुळे मुंबईची 4.5 ओव्हरमध्ये 2 आऊट 37 अशी स्थिती झाली.
त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमनजौत कौर या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि मुंबईच्या विजयाचा पाया रचला. या दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी 44 बॉलमध्ये 72 रन्स जोडल्या. मात्र त्यानंतर अमनजोत आऊट झाली. अमनजोतने 26 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 40 धावा केल्या. अमनजोतनंतर निकोला कॅरी मैदानात आली. हरमनप्रीत आणि निकोला या जोडीने निर्णायक भागीदारी करत मुंबईला विजयी केलं.
हरमनप्रीत आणि निकोला या दोघींनी दोन्ही बाजूने फटकेबाजी केली. तसेच निकोलाने हरनप्रीतला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली. हरमनप्रीतने याचा फायदा घेत टॉप गिअरमध्ये बॅटिंग करणं सुरु ठेवलं. हरमनने गुजरातच्या गोलंदाजांना बॅटिंगने चोप दिला. कॅप्टनने मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि निकोलाच्या मदतीने मुंबईला सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवून दिला. हरमनप्रीत आणि निकोला या दोघींनी चौथ्या विकेटसाठी फक्त 43 बॉलमध्ये 84 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली.
निकोलाने 23 बॉलमध्ये 6 फोरसह नॉट आऊट 38 रन्स केल्या. तर कॅप्टन कौरने 43 चेंडूत 165.12 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 71 धावांची खेळी साकारली. हरमनप्रीतने या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकार लगावले.