आरसीबीची विजयी हॅटट्रिक, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?

WPL 2026 Points Table : आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स टीमने चौथ्या मोसमातील धमाका सुरुच ठेवला आहे. आरसीबीने स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात सलग तिसरा विजय साकारला आहे.

आरसीबीची विजयी हॅटट्रिक, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?
Smriti Mandhana Royal Challengers Bengaluru Women
Image Credit source: WPL/Bcci
| Updated on: Jan 17, 2026 | 3:21 AM

WPL 2026 Points Table : वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमातील नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने शुक्रवारी 17 जानेवारीला गुजरात जायंट्सवर मात केली. आरसीबीने गुजरातला 32 धावांच्या सुरक्षित फरकाने गुजरात लोळवलं आणि या मोसमातील सलग आणि एकूण तिसरा विजय साकारला. आरसीबीने राधा यादवच्या 66 आणि ऋचा घोष हीच्या 44 धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने या धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरातला 7 बॉलआधीच गुंडाळलं. आरसीबीने गुजरातला 18.5 ओव्हरमध्ये 150 धावांवर ऑलआऊट केलं. श्रेयांका पाटील हीने 5 विकेट्स घेत गुजरातला गुंडाळण्यात प्रमुख योगदान दिलं. आरसीबीला या विजयासह आणखी एक आणि मोठा फायदा झाला आहे.

आरसीबीला पॉइंट्स टेबलमध्ये फायदा

आरसीबीने गुजरातला पराभूत करुन पॉइंट्स टेबलमधील आपलं अव्वल स्थान आणखी भक्कम केलंय. आरसीबी पहिल्याच स्थानी कायम आहे. आरसीबीने 3 पैकी 3 सामने जिंकलेत. त्यामुळे आरसीबीच्या खात्यातील पॉइंट्सची संख्या ही 4 वरुन 6 अशी झालीय. मात्र आरसीबीला नेट रनरेटमध्ये फटका बसलाय. सलग तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर नेट रनरेटमध्ये वाढ होण्याऐवजी त्यात घट झालीय. त्यामुळे चाहत्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नक्की काय झालंय?

आरसीबी टीमने 12 जानेवारीला मोसमातील पाचव्या सामन्यात युपी वॉरियर्सचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला होता. आरसीबीने यूपी विरुद्ध 144 धावांचं आव्हान हे 47 बॉलआधी पूर्ण केलं होतं. आरसीबीने 12.1 ओव्हरमध्ये 145 धावा केल्या होत्या. तर आरसीबीने शुक्रवारी गुजरात जायंट्स विरुद्ध 16 जानेवारीचा सामना हा विजयी धावांचा बचाव करताना जिंकला. एखादा संघ किती चेंडूंआधी विजय मिळवतो यावर नेट रनरेटचं गणित ठरतं. त्यामुळे धावांचा बचाव करुन जिंकणाऱ्या आरसीबीला नेट रनरेटमध्ये फायदा होण्याऐवजी तोटा झालाय.

आधी आणि नंतर नेट रनरेटमध्ये किती अंतर?

यूपीला पराभूत केल्यानंतर आरसीबीचा नेट रनरेट हा +1.964 इतका होता. तर सलग तिसऱ्या विजयानंतर तो रनरेट +1.828 असा झाला आहे.

आरसीबीला नेट रनरेटमध्ये फटका

आरसीबीचा चौथा सामना केव्हा?

दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स टीमचा या मोसमातील चौथा सामना हा शनिवारी 17 जानेवारीला होणार आहे. आरसीबीसमोर या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. आरसीबीचा या सामन्यात विजय मिळवून सलग चौथा सामना जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे.