RCBW vs GGTW : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुजरातला 32 धावांनी नमवलं
वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेच्या नवव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात आरसीबीने 32 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात काय झालं ते जाणून घ्या

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजराज जायंट्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. खरं तर दव फॅक्टर पाहता हा निर्णय योग्य होता. पण धावांचा पाठलाग करणं काही गुजरात जायंट्सला जमलं नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकात 7 गडी गमवून 182 धावा केल्या आणि विजयासाठी 183 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही गुजरात जायंट्सला गाठता आलं नाही. गुजरात जायंट्सने 18.5 षटकात सर्व गडी गमवून 150 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना आरसीबीने 32 धावांनी जिंकला. यासह या स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवला आहे. कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्वात आरसीबीची विजयी घोडदौड सुरू आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरूवात काही चांगली झाली नाही. पावर प्लेमध्येच आरसीबीला मोठा धक्का बसला. पावरप्लेच्या 6 षटकात 4 गडी गमवून 45 धावा केल्या. त्यामुळे संघावर दडपण आलं होतं. पण राधा यादव आणि ऋचा घोष यांनी डाव सावरला आणि टीमला संकटातून बाहेर काढलं. या जोडीने 105 धावांची भागीदारी केली. राधा यादवने 47 चेंडूत 66 धावा केल्या. तर ऋचा घोषने 44 धावांची खेळी केली. नादीन डी क्लार्कने 12 चेंडूत 26 धावा काढल्या. त्यांच्या या खेळीमुळे आरसीबीने 182 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून सोफी डिव्हाईनने 3, काश्वी गौतमने 2, रेणुका सिंग ठाकुरने 1 आणि जॉर्जिया वारेहमने 1 गडी बाद केला.
गुजरात जायंट्स हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. पण त्याचा पत्त्यासारखा कोसळला. श्रेयंका पाटीलने निम्मा संघ तंबूत पाठवला. तिने 3.5 षटकात 23 धावा देत 5 गडी बाद केले. तर लॉरेन बेलने 3, अरुंधती रेड्डीने 1 आणि नादीन डी क्लार्कने 1 गडी बाद केला. या विजयात श्रेयंकाचा मोलाचा हातभार लागला. त्यामुळे तिला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. श्रेयंका पाटील म्हणाली की, ‘मी राधाला श्रेय द्यायला आवडेल कारण जर तिची खेळी नसती तर आम्हाला तेवढी धावसंख्या वाढवता आली असती असे मला वाटत नाही. पहिल्या डावात रिचा आणि राधाने ज्या पद्धतीने योगदान दिले, चार फलंदाज बाद झाले होते, तेव्हा आम्ही 4 बाद 44 धावा केल्या होत्या आणि नंतर फक्त त्या डावात खेळताना, मला वाटते की हा एक मोठा परिणाम आहे आणि त्यामुळे आम्हाला170-180 धावसंख्या पाहून खूप आत्मविश्वास मिळाला.’
‘दव महत्त्वाची भूमिका बजावणार आहे हे जाणून आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला. गेल्या काही सामन्यांमध्ये आम्हाला माहित होते की, आम्ही प्रचंड दव पाहिले, जोरदार दव येत आहे कारण या खेळपट्टीवर आम्ही शेवटचे दोन सामने खेळलो होतो. तेव्हा आम्हाला इतका दव पडला नव्हता. म्हणून आम्ही आज दव पडण्यासाठी तयार होतो आणि मला वाटते की गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आणि टी20 मध्ये मला पहिल्यांदा पाच बळी मिळाले याचा मला खूप आनंद आहे.’, असंही ती पुढे म्हणाली
